९२ हजार कोटीवरून तब्बल २ लाख ३२ हजार कोटीवर झेप…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ फेब्रुवारी २०२१) :- २०२१ या वर्षांचा देशाचा अर्थसंकल्प Union Budget 2021 for Health Care सादर करण्यापूर्वी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गेल्या काही कालावधीत आणि लॉकडाऊन दरम्यान सरकारनं केलेल्या कामगिरीची माहिती दिली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षीचा अर्थसंकल्प हा वेगळा होता. यावेळी कोणत्याही कागदपत्रांशिवाय टॅबच्या सहाय्यानं हा अर्थसंकल्प मांडण्यात आला.
सुरुवातीलाच लॉकडाऊन आणि कोरोना संदर्भात माहिती देताना केंद्र सरकारने दिलेल्या योजनांचाही त्यांनी उल्लेख केला. तसेच, देशातील कोरोना परिस्थिती आटोक्यात आली असून जगातील सर्वात कमी रुग्णसंख्या असलेल्या देशांमध्ये भारत आहे, असेही त्यांनी सांगितले.
कोरोनामुळे देशाच्या आरोग्य क्षेत्राची जाणीव आपल्याला करुन दिली. त्यामुळेच, यंदाच्या अर्थसंकल्पात आरोग्य क्षेत्राला भरभरुन देण्यात आलं आहे. आरोग्य खात्याच्या अर्थसंकल्पात तब्बल १३७ टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. अर्थसंकल्पात ३५ हजार कोटी रुपये कोरोना लसीकरणासाठी देण्यात आले असून गरज भासल्यास आणखी निधी देण्यात येईल, असे निर्मला सितारमण यांनी सांगितलं. यंदा आरोग्य खात्यासाठी तब्बल २ लाख ३२ हजार कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर होत आहे. गेल्या वर्षीचा आरोग्य खात्याचा अर्थसंकल्प हा ९२ हजार कोटी रुपयांचा होता. म्हणजेच, यंदाच्या बजेटमध्ये तब्बल १३७ टक्क्यांनी वाढ झाली आहे.


















