- चेअरमनसह इतरांवर पोलिसांकडून चोरीचा गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०३ फेब्रुवारी २०२१) :- दि सेवा विकास को – ऑप बँकेच्या चिंचवडमधील चापेकर चौक येथील शाखा कार्यालयातून सोमवारी (दि. १) दोन जणांनी रिकव्हरी विभागातील संगणकातून बँकचा डाटा विनापरवानगी पेन ड्राइव्हमध्ये कॉपी करून घेतला. तसेच त्या दोघांना हटकले असता त्यांनी कागदपत्रे फाडून पुरावा नष्ट केला. याप्रकरणी बँकेचे माजी चेअरमन, माजी अतिरिक्त सीईओ आणि अन्य दोघांच्या विरोधात पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला.
बँकेच्या वसुली अधिकारी असलेल्या रुमी महेश मंगतानी (वय ५२, रा. पिंपळे सौदागर) यांनी याबाबत चिंचवड पोलीस ठाण्यात सोमवारी (दि. १) फिर्याद दिली. त्यानुसार दि सेवा विकास बँकेचे माजी चेअरमन अमर मूलचंदानी (वय ६३, रा. पिंपरी), माजी अतिरिक्त सीईओ निखिल शर्मा (वय ३५, रा. पिंपळे सौदागर), हितेश ढगे (वय ३२, रा. काळेवाडी) आणि एक अनोळखी व्यक्ती यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला.
मूलचंदानी व शर्मा यांच्या सांगण्यावरून आरोपी हितेश ढगे आणि त्याचा साथीदार सोमवारी बँकेच्या शाखा कार्यालयात आले. खासगी – साहित्य घेऊन जाणार असल्याचे सांगून रिकव्हरी विभागातील संगणकातून बँकेचा डाटा स्वतःच्या पेन ड्राइव्हमध्ये विना परवानगीने कॉपी करून घेतला. रिकव्हरी विभागातील फाईलमध्ये बँकेची कागदपत्रे घेऊन जात होते. त्यावेळी आरोपी हितेश आणि त्याच्या साथीदाराला बँकेच्या कर्मचाऱ्यांनी हटकले. आरोपींनी पिंपरी चे पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्याची एफआयआर कॉपी व सेवा विकास बँकेचे नाव असलेला नकाशा फाडून पुरावा नष्ट केला.
पिपरी येथील दि सेवा विकास बँकेतून ३० जानेवारी २०२१ रोजी बँकेचे दस्तावेज चोरी केल्याचा आणखी एक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी मनोज लक्ष्मणदास बक्षाणी (वय ५२, रा. पिपरी) यांनी पिपरी पोलीस ठाण्यात सोमवारी फिर्याद दिली. त्यानुसार डॉली मुकेश सेवानी (रा. वैभवनगर, पिपरी), निखिता महेश चंदवानी (रा. पिपरी), सागर खेडकर (रा. रहाटणी, काळेवाडी), गोविद श्रीवास (रा. नढेनगर, पुणे), माजी चेअरमन अमर मूलचंदानी (रा. पिपरी), माजी अप्पर मुख्य कार्यकारी अधिकारी निखिल शर्मा (रा. पिपळे सौदागर) यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आरोपी डॉली ही बँकेची एचआर मॅनेजर म्हणून कामास होती. तिने व इतर आरोपींनी गुन्हेगारी कट रचला. बँकेचे माजी चेअरमन अमर मूलचंदानी तसेच निखिल शर्मा यांच्यावर पूर्वी दाखल गुन्ह्याबाबतचे महत्त्वाचे पुरावे असलेले बँकेचे दस्तावेज पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने चोरुन नेले.















