- निवडणुक आयोगाकडून मतदार याद्या अद्ययावतीचे आदेश..
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०३ फेब्रुवारी २०२१) :- चिखली, आकुर्डी, दिघी प्रभागातील तीन नगरसेवकांचे कोरोना काळात निधन झाले होते. या प्रभागांतील पोटनिवडणुकीची तयारी सुरू झाली असून राज्य निवडणुक आयोगाने मतदार याद्या अद्ययावत करण्याचे आदेश महापालिकेस दिले आहेत.
कोरोना काळात नागरिकांची सेवा करताना चिखली प्रभाग क्रमांक एक ‘ ड’चे नगरसेवक आणि विरोधी पक्षनेते दत्ता साने, आकुर्डीतील प्रभाग चौदा ‘ अ’चे राष्टवादी काँग्रेसचे नगरसेवक जावेद शेख, दिघी प्रभाग क्रमांक चार ‘ब’ मधील भाजपाचे नगरसेवक लक्ष्मण उंडे यांचा मृत्यू झाला होता. रिक्त झालेल्या जागांवर पोटनिवडणूक घेण्यात यावी, यासंदर्भातील माहिती राज्य निवडणूक आयोगाकडे माहिती पाठविली होती. त्यानुसार पोटनिवडणुकीची तयारी सुरु झाली आहे. राज्य निवडणूक आयोगाचे प्रभारी सचिव अविनाश सणस यांनी महापालिकांना निवडणुकीसंदर्भातील बिनविरोध प्रक्रिया राबविण्याचे निर्देश दिले आहेत आणि महापालिका क्षेत्रातील तीन पोटनिवडणूक एप्रिल किंवा मे मध्ये महापालिकांच्या सार्वत्रिक किंवा पोटनिवडणुका घेण्याचे नियोजन केले आहे.
त्यानुसार १५ जानेवारी २०२१ ची विधानसभा निवडणुकीची मतदारयादी ग्राह्य धरण्यात येणार आहेत. त्यामुळे महापालिकांना मतदार यादी तयार करण्याचे आदेश दिले आहे. त्यानुसार दिनांक १६ फेब्रुवारीला प्रारूप मतदारयादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यानंतर १६ ते २३ फेबुवारीपर्यंत हकरती आणि सूचनांसाठी कालावधी देण्यात आला आहे. त्यानुसार ३ मार्चला प्रभागनिहाय अंतिम मतदारयादी प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. त्यानंतर १२ मार्चला प्रभागनिहाय व मतदान केंद्रनिहाय याद्या प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
प्रभागांतील नगरसेवकांच्या रिक्त जागांसाठी पोटनिवडणूक होणार आहे. त्यामुळे या प्रभागांतील निवडणूक बिनविरोध करावी, यासाठी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत.















