- १६ जणांना गंडा घालणाऱ्या तरुणीकडून १५ लाखांचा मुद्देमाल जप्त…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०३ फेब्रुवारी २०२१) :- डेटिंग अॅपद्वारे मैत्री करून तरुणांना लुबाडणारी उच्चशिक्षित तरुणी अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकली आहे. सायली देवेंद्र काळे (वय २७, रा. साधू वासवानी रोड, पुणे) असे तिचे नाव आहे. तिने आतापर्यंत १६ जणांना गंडा घातल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी तिच्याकडून सोन्याचे दागिने व मोबाईल फोन असा १५ लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पिंपरी- चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट चारच्या पथकाने ही कारवाई केली.
पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी तरुणीने बंबल अॅपवर मैत्री करून रावेत येथील तरुणाला १० डिसेंबर २०२० रोजी भेटण्यास बोलावले. भेटीदरम्यान तरुणीने त्याला गुंगीचे औषध देत त्याच्याकडील सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण एक लाख ८५ हजारांचा ऐवज काढून घेतला. तसेच, १७ जानेवारी रोजी चेनई येथून वाकड येथे आलेल्या एका युवकाकडील सोन्याचे दागिने, रोख रक्कम असा एकूण दीड लाखाचा ऐवज अशाच पद्धतीने काढून घेतला.
आरोपी तरुणी ही डेटिंग अॅपवरून श्रीमंत तरुणांना हेरून त्यांच्याशी ओळख वाढवत असे. तरुणाच्या पसंतीनुसार तरूणी संबंधित तरुणाच्या घरी किंवा लॉजवर भेटायला जात असे. त्यानंतर शीतपेयात गुंगीच्या गोळ्या टाकून तरुणाच्या अंगावरील दागिने आणि रोख रक्कम घेऊन पोबारा करीत असे. दागिने आणि पैसे काढून घेतल्यानंतर तरुणी त्यांचा मोबाईल फोडून टाकून त्यातील चॅट डिलिट करून डेटिंग अॅपवरील खाते डिअॅक्टिव्ह करीत असे. त्यामुळे पोलिस तिच्यापर्यंत पोहचत नव्हते.
या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी बंबल अॅपवर स्वत:चे खोटे प्रोफाईल तयार करून आरोपी तरुणीचे विविध प्रोफाईल शोधून काढले. तरुणीला जाळ्यात अडकवण्यासाठी फ्रेंड रिक्वेस्ट पाठविल्या. त्यातील एक फ्रेंड रिक्वेस्ट तरुणीने स्वीकारली. त्यानंतर चॅटिंग करून भेटीची वेळ ठरविण्यात आली. भूमकर चौक येथे २६ जानेवारीला भेटायला आल्यानंतर तरुणीला ताब्यात घेण्यात आले. आयुक्तांकडून पथकाचे कौतुक या कामगिरीचे पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी कौतुक केले. या कामगिरीसाठी पथकाला त्यांनी बक्षीस जाहीर केले.















