- नगरसेविकेच्या पतीसह पाच जणांवर गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०३ फेब्रुवारी २०२१) :- कंपनीतून चोरलेला माल खरेदीप्रकरणी नगरसेविका कमल घोलप यांच्या पतीसह पाच जणांवर गुन्हा दाखल करून तिघांना अटक करण्यात आली आहे. ही घटना शुक्रवारी (दि. २९) सकाळी सावरदरी, खेड येथे उघडकीस आली.
इम्रान बागवान, इम्रान हुसेन, रणजित चौहान अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तर, नगरसेविकेचा पती अनिल उर्फ बापू घोलप (रा. यमुनानगर, निगडी) आणि रशीद (पूर्ण नाव व पत्ता माहिती नाही) हे दोघे फरार झाले आहेत. याप्रकरणी अमोल प्रकाश डोबळे (३६, रा. सावरदरी, चाकण) यांनी म्हाळुगे पोलिस चौकीत फिर्याद दिली आहे.
पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिलेल्या माहितीनुसार, २० डिसेंबर २०२० ते २९ जानेवारी २०२१ या कालावधीत सावरदरी येथील एका खासगी न कंपनीतून चोरट्यांनी दोन लाख ४० हजार रुपये किमतीचे साहित्य चोरून नेले. या गुन्ह्याचा तपास करीत असताना पोलिसांनी सुरक्षारक्षक रणजित चौहान याला संशयावरून ताब्यात घेतले. त्याने गुन्ह्याची कबुली देत आरोपी बागवान आणि हुसेन यांना चोरीचा माल विकल्याचे पोलिसांना सांगितले. त्यानुसार पोलिसांनी त्यांनाही अटक केली.
त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत त्यांनी फरार आरोपी बापू घोलप आणि रशीद यांना माल विक्री केल्याची कबुली दिली. त्यानुसार पोलिस त्या दोघांचा शोध घेत आहेत. पुढील तपास म्हाळुगे पोलिस करीत आहेत.















