न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०३ फेब्रुवारी २०२१) :- खंडणी विरोधी पथकाने काळेवाडी येथे दोघांना अटक केली. त्यांच्याकडून दोन पिस्टल आणि चार जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. तर देहूरोड पोलिसांनी एकाला अटक करून त्याच्याकडून एक पिस्टल आणि एक जिवंत काडतूस जप्त केले आहे.
मयूर अनिल घोलप (वय २७, रा. चिंचवडगाव), विकी अनिल घोलप (वय २३, रा. चिंचवडगाव) अशी खंडणी विरोधी पथकाने अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. दोन्ही आरोपी सोमवारी सायंकाळी साडेसहा वाजता काळेवाडी, पवनानगर येथे ज्योतिबागार्डन जवळ पिस्तूल घेऊन आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार, पोलिसानी सापळा लावून दोघा भावांना अटक केली. त्यातील मयूर यांच्याकडून एक देशी बनावटीचे पिस्टल आणि तीन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. तर आरोपी विकी यांच्याकडून एक पिस्टल आणि एक काडतूस जप्त केले.
देहूरोड पोलिसांनी विजय सतीश वाल्मिकी (वय २१, रा. झेंडेमळा, देहूगाव) याला अटक केली आहे. त्याच्याकडून एक पिस्टल आणि एक जिवंत काडतूस जप्त केले आहे. ही कारवाई नायडू नगर, झेंडेमळा येथे सोमवारी (दि. १) दुपारी तीन वाजता करण्यात आली. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.
















