- आरोपीने महिलेला घातला ऑनलाईन १२ लाखांना गंडा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंरी (दि. ०४ फेब्रुवारी २०२१) :- फिर्यादी महिला आणि आरोपी यांची मेट्रोमोनीयल, डेटिंग अॅपच्या माध्यमातून ओळख झाली. त्यांनतर त्यांनी व्हॉट्सअॅप कॉल, व्हिडीओ कॉल आणि मेलआयडी द्वारे एकमेकांशी संवाद साधला. त्यात आरोपीने ‘तो अमेरिकेत कॉस्मेटिक सर्जन डॉक्टर आहे. त्याला फिर्यादीसोबत लग्न करायचे आहे. भारतात येऊन स्थायिक व्हायचे आहे’ असे सांगितले.
त्यानंतर आरोपीने त्याच्या आईच्या डोक्याला मार लागला असून तिच्यावर उपचारासाठी बेंगलोर येथील शिनॉय फार्म येथील XINOCIN नावाची औषधी बियांचे औषध पाठविण्यासाठी एक लाख २९ हजार ९०० रुपये भरण्यास भाग पाडले. आरोपीचे वडील व फिर्यादी यांच्या वडिलांसोबत मिळून त्याच औषधी बियांचा भागीदारीमध्ये व्यवसाय कारण्याचे अमिश दाखवून त्यापोटी सहा लाख ४९ हजार ५०० रुपये भरण्यास भाग पाडले. बनावट औषधी बिया देऊन त्या विकत घेण्यासाठी अमेरिकेतील एका कंपनीच्या परचेस मॅनेजरसोबत आपण भारतात येत असल्याचे सांगितले. भारतात एअरपोर्टवर ग्रीन कार्ड नसल्याने पकडले असून तेथून सोडविण्यासाठी दंड म्हणून दोन लाख ७० हजार, आजारी असल्याचे सांगून ८० हजार घेतले. त्याच्या सोबत भारतात आलेल्या परचेस मॅनेजरने व्यवसायासाठी आणलेले डॉलर कस्टमने पकडले असल्याने ते सोडविण्यासाठी एक लाख रुपये देण्यास सांगितले.
वेगवेगळ्या कारणांसाठी आरोपी अर्जुन याने फिर्यादी महिलेकडून १२ लाख २९ हजार ४०० रुपये वेगवेगळ्या बॅंक खात्यांवर भरण्यास सांगितले. ते पैसे त्याने परत दिले नाहीत. तसेच औषधी बियांचा व्यवसाय न करता फिर्यादी आणि त्यांच्या वडिलांची फसवणूक केली. याबाबत अर्जून गोपाल या व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.














