न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७. डिसें.) :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान होईपर्यंत स्वत:च्या पत्नी विषयी माहिती दिली नाही. ‘राफेल’ कराराबाबत सर्वेाच्च न्यायालयात सरकारने खोटी माहिती सादर केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात खोटी माहिती दिली. यामुळे जनता,निवडणूक आयोग व न्यायालयाची पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वांची फसवणूक केली आहे. याबाबत त्यांनी देशाची माफी मागावी, अशी मागणी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे यांनी केली आहे.
पिंपरी चिंचवड शहर कॉंग्रेसच्या वतीने जनसंवाद अभियान सुरु केले आहे. अंजठानगर येथील झालेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी प्रदेश मागासवर्गीय विभागाचे उपाध्यक्ष गौतम आरकडे, विष्णुपंत नेवाळे आदी उपस्थित होते.
सचिन साठे म्हणाले की, प्रत्येक नागरीकांच्या खात्यात पंधरा लाख रुपये जमा करु, दरवर्षी दोन कोटी बेरोजगारांना नोकरी देऊ, शेतक-यांचे पूर्ण कर्ज माफ करुन शेतीमालाला हमीभाव देऊ, अशी शेकडो आश्वासने पंतप्रधान मोदी, शहा यांनी देशातील जनतेला दिली. मात्र, यातील एकही आश्वासन पुर्ण केले नाही. याबाबत मोदी, शहा व भाजपाने सर्व नागरीकांची प्रथम माफी मागावी. राफेल प्रकरणी सर्वेाच्च न्यायालयात खोटी माहिती देणारे सरकार,पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपा अध्यक्ष अमित शहा यांना कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी माफी मागावी, अशी मागणी करण्याचा नैतिक अधिकार आहे काय? असाही प्रश्न साठे यांनी उपस्थित केला.












