- टोळीवर ३० गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०६ फेब्रुवारी २०२१) :- निगडीतील सराईत गुन्हेगार रोहन चंदेलिया उर्फ चंडालिया या गुन्हेगारी टोळीवर मोक्काची कारवाई करण्यात आली आहे. अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत. रोहन राहू चंदेलिया उर्फ चंडालिया (२०, रा. जाधववस्ती, रावेत), विजय उर्फ गुंड्या निळकंठ शिंदे (२८, रा. ओटास्कीम, निगडी), प्रदीप महादेव जगदाळे (१९, रा. ओटास्कीम, निगडी), विशाल सोळसे (१९, रा. ओटास्कीम, निगडी), निलेश उर्फ निलू देविदास कांबळे (२२, रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड), यश उर्फ रघु अतुल कदम (१९, रा. ओटास्कीम, निगडी), किरण शिवाजी खवले (२०, रा. ओटास्कीम, निगडी), नंदकिशोर उर्फ मनोज उर्फ मन्या शेषराव हाडे (२५, रा. गणेश नगर, चिखली) आणि अन्य दोन अल्पवयीन मुले अशी मोक्काची कारवाई केलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींच्या विरोधात दरोडा, खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, दुखापत, घरफोडी, बलात्कार, अपहरण करणे, जबरी चोरी करून दुखापत करणे, दरोड्याची तयारी करणे, सार्वजनिक ठिकाणी लोकांमध्ये दहशत माजवणे, वाहनांची तोडफोड करणे, बेकायदेशीर अग्निशस्त्र बाळगणे, बेकायदेशीररित्या घातक शस्त्रे जवळ बाळगणे असे एकूण ३० गुन्हे पिंपरी – चिंचवड शहर, पुणे शहर येथे दाखल आहेत.
आरोपी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी टोळी बनवून संघटितपणे गुन्हे करीत असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. याबाबत गुन्हे शाखेच्या पीसीबी विभागाने या टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन १९९९ (मोक्का) नुसार कारवाई करण्याचा अहवाल सादर केला होता. अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे मंजुरी देत कारवाईच्या सूचना दिल्या.
















