- भाजप ४, शिवसेना १, अपक्ष १ तर, राष्ट्रवादीच्या २ सदस्यांचा समावेश…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०६ फेब्रुवारी २०२१) :- महापालिकेच्या स्थायी समितीतील ८ सदस्यांचा २ वर्षांचा कार्यकाळ २८ फेब्रुवारीला संपत आहे. त्यामुळे येत्या १८ फेब्रुवारीच्या सर्वसाधारण सभेत नवीन सदस्यांची निवड करण्यात येणार आहे. कार्यकाळ संपुष्टात आलेल्या सदस्यांमध्ये विद्यमान अध्यक्षांचाही समावेश आहे.
पंचवार्षिकतील शेवटच्या वर्षी समिती सदस्यपदी वर्णी लागावी म्हणून अनेक नगरसेवक इच्छुक असून, त्यासाठी पक्षनेत्यांकडे मोर्चेबांधणी केली जात आहे. समितीमधील दोन वर्षाचा निर्धारित कार्यकाल संपुष्टात येणार असल्याने १६ पैकी ८ सदस्य २८ फेब्रुवारीला निवृत्त होणार आहेत.
यामध्ये विद्यमान अध्यक्ष संतोष लोंढे, शीतल शिदे, आरती चौधे, राजेंद्र लांडगे (सर्व भाजप), शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे मयूर कलाटे, पंकज भालेकर, अपक्ष झामाबाई बारणे यांचा समावेश आहे.
भाजपचे शशिकांत शिंदे, भीमाबाई फुगे, अंबरनाथ कांबळे, सुवर्णा बुर्डे, संतोष कांबळे, अभिषेक बारणे, राष्ट्रवादीच्या पौर्णिमा सोनवणे, सुलक्षणा धर हे सदस्य कायम राहणार आहेत. निवृत्त होणाऱ्या ८ सदस्यांच्या जागी नवीन ८ सदस्यांची निवड करण्यात येणार आहे. त्यात भाजपचे ४ सदस्य, शिवसेना आणि अपक्षांचा १ तर, राष्ट्रवादीचे २ सदस्य असतील.
पक्षाचे गटनेते १८ फेब्रुवारीच्या सर्वसाधारण सभेत नव्या सदस्याच्या नावांची शिफारस महापौरांकडे करतील. पंचवार्षिकेतील शेवटच्या वर्षात तरी, स्थायी समितीच्या सदस्यपदी वर्णी लागावी यासाठी अनेक नगरसेवकांनी शहरातील कारभाऱ्यांकडे साकडे घालण्यास सुरुवात केली आहे.
















