- मंदिरांचे पुनःसर्वेक्षण न करता अतिक्रमण कारवाई बेकायदा
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
चिंचवड (दि. १८ डिसें.) :- बिजलीनगर येथील पुरातन बांधावरची देवी म्हणून परिसरात प्रसिद्ध असणारी तुळजाभवानी देवीचे मंदिर आणि शिवनगरी येथील २००५ मध्ये स्थापन झालेले गणेश मंदिर ही दोनही धार्मिक स्थळे प्राधिकरण प्रशासनाच्या नियमबाह्य कारवाईचे बळी ठरणार आहेत.
प्राधिकरण प्रशासनाचा हातोडा ह्या मंदिरांवर पडणार असल्यामुळे हजारो हिंदु धर्मियांची मने दुखावली गेली आहेत. बिजलीनगर परिसरामध्ये त्यामुळे पुन्हा एकदा तणावाचे वातावरण तयार झाले आहे. महिला भगिनींनी यामुळे तीव्र संताप व्यक्त केला आहे. प्राधिकरण प्रशासनाने २४ तासात मंदिर पाडण्याची कारवाई करणेबाबत नोटीस दोनही मंदिरांना बजावली आहे.
या संदर्भात आज रोजी शेकडो बिजलीनगर परिसरातील रहिवास्यांनी प्राधिकरण कार्यालयाकडे धाव घेतली. घर बचाव संघर्ष समिती पदाधिकारी तसेच मंदिर विश्वस्त पदाधिकारी यांनी याबाबत प्राधिकरण अध्यक्ष सदाशिव खाडे, मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश खडके, क्षेत्रीय अधिकारी वसंत नाईक यांची भेट घेतली. याप्रसंगी घर बचाव संघर्ष समितीचे मुख्य समन्वयक विजय पाटील, समन्वयक आबा सोनवणे, संतोष चव्हाण, शुभम वाघमारे, मंदिर विश्वस्त संभाजी जराड, निलेश चोगुले, दत्तात्रय होले, सुनिल होले, विशाल घावटे, सचिन पाटील, अभिषेक जराड, शंकर चोगुले, बंटी महाजन उपस्थित होते.
या प्रसंगी प्राधिकरण मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश खडके म्हणाले,” अनधिकृत मंदिरांवर कारवाई करण्याचे सुप्रीम कोर्टाचे आदेश असल्या कारणाने मंदिरांवर कारवाई केली जात आहे. शहरातील १२८ मंदिरांपैकी १२४ मंदिरे नियमित केली असून सदरील ४ मंदिरे उच्चदाब विजवाहिनीच्या खाली असल्यामुळे कारवाई करीत आहोत. तरीही मंदिरांचे पुनः निरीक्षण केले जाईल तसेच परिसरातील रहिवास्यांची हरकती आणि सूचनांवर सुनावणी घेतली जाईल व संबंधीत बाबत रिपोर्ट प्राधिकरणाकडून मंदिर निरीक्षण समितीचे अध्यक्ष पिंपरी चिंचवड शहर आयुक्त यांचेकडे पाठवला जाईल.”
मुख्य समन्वयक विजय पाटील म्हणाले,” गेल्या वर्षी प्राधिकरण प्रशासनाला मंदिर परिसरातील ७५० रहिवास्यांनी सूचना व हरकती नोंदवल्या होत्या. सदरील मंदिरांवर कारवाई का करू नये याबाबतही निवेदन दिले होते. तदनंतर आज वर्षानंतरही या रहिवास्यांना सुनावणीसाठी बोलविण्यात आले नाही. त्यामुळे आज मंदिर पडण्याची मोहीम ही एकतर्फी असून. नैसर्गिक न्यायतत्वाचे तसेच धार्मिक स्वातंत्र्याचे पूर्णपणे उल्लंघन होत आहे. जोपर्यंत सुनावणी, पुनःनिरीक्षण, समिती अध्यक्ष अपील ह्या कायद्याच्या प्रक्रिया पूर्ण होत नाहीत तोपर्यंत मंदिरांवर कारवाई करू नये. सुप्रीम कोर्टानेही कारवाई करताना धार्मिक स्वातंत्र्याचे व नियमांचे उल्लंघन करू नये असे निर्देश दिलेले आहेत. त्याचे पालन प्राधिकरण प्रशासनाने करावे. पुणे महापालिका हद्दीतील धनकवडी सारखी नियमबाह्य कारवाई पिंपरी चिंचवड शहरातील मंदिरांवर करू नये.”
प्राधिकरण अध्यक्ष सदाशिव खाडे म्हणाले,” ज्या प्रमाणे शहरातील १२४ मंदिरे नियमित केली त्याप्रमाणे सदरील मंदिरांवर कारवाई करण्यापूर्वी रहिवाश्यांचे म्हणणे प्रशासनाने ऐकून घ्यावे. लवकरच आपल्या परिसरातील ह्या दोनही मंदिरांचे निरीक्षन मी स्वतः करण्यासाठी येईल. धार्मिक लोकभावनेचा नक्कीच आदर ठेवला जाईल.”
समन्वयक आबा सोनवणे म्हणाले,” उच्चदाब वीज वाहिनीचे नूतनीकरण काम होऊन सदरील वीजवाहिनी आता सुरक्षित अंतरावर बसविण्यात आलेली आहे. त्यामुळे मंदिरास आता कोणताही संभाव्य धोका नाही. त्यामुळे याबाबत प्रशासनाने महावितरण कार्यालयाचा अभिप्राय मागवून घ्यावा. तोपर्यंत कारवाई करू नये.”












