- अधिकाऱ्याचे झटापट करून पलायन; पुनावळेतील घटना…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ फेब्रुवारी २०२१) :- चार जणांनी लिफ्ट मागण्याच्या बहाण्याने आयटी कंपनीतील अधिकाऱ्याच्या डोक्याला व पोटाला पिस्तुल लावून जिवे मारण्याची धमकी दिली. मात्र, झटापट करून पळ काढून अधिकाऱ्याने स्वत:ची सुटका करून घेतली. पुनावळे येथे मुंबई- बेंगळुरू महामार्गाच्या सेवा रस्त्यावर सोमवारी सकाळी पावणेनऊच्या सुमारास ही घटना घडली.
सुरेशचंद्र जोशी (वय ४४, रा. पुनावळे, मूळ रा. उत्तरांचल) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात सोमवारी (दि. ८) फिर्याद दिली. त्यानुसार चार अनोळखी आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी त्यांच्या चारचाकी वाहनाने कंपनीत कामावर जात होते. त्यावेळी त्यांच्या सोसायटीच्या गेटसमोर खाकी कपडे घातलेला व हातात काठी असलेला एक आरोपी थांबला होता. त्या आरोपीने लिफ्ट मागण्याच्या बहाण्याने फिर्यादी यांची गांडी थांबविली. त्यानंतर आरोपी त्यांच्या गाडीत बसला. त्याला घेऊन पुढे जात असताना मुंबई – बेंगळुरू महामार्गाच्या सेवा रस्त्याच्या अलीकडे त्याने गाडी थांबविण्यास सांगितली. त्यानुसार फिर्यादी यांनी गाडी थांबवली असता आरोपीने अज्ञात कारणावरून त्यांच्या डोक्यास व पोटास पिस्तूल लावून जिवे मारण्याची धमकी दिली. त्याचवेळी त्याचे साथीदार असलेले इतर आरोपी तेथे आले. त्यातील एकाने फिर्यादी यांना गाडीतून बाहेर ओढण्याचा प्रयत्न केला. तसेच गाडीत मागे बसण्यास सांगून फिर्यादी यांना धमकावले. त्यावेळी फिर्यादी यांनी झटापट करून तेथून पळ काढून स्वत:चा बचाव केला.