- अंतिम सर्वसाधरण सभेत सदस्यांना भावना अनावर…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ फेब्रुवारी २०२१) :- संरक्षण मंत्रालयाने कॅन्टोन्मेंट बोर्ड सदस्यांची दुसऱ्यांदा वाढवलेली सहा महिन्यांची मुदत बुधवारी (दि. १०) संपल्याने मंत्रालयाच्या आदेशान्वये देहुरोड, खडकी व पुण्यासह देशातील ६२ पैकी ५६ कॅन्टोनमेंट बोर्ड बरखास्त केले आहेत.
देहूरोड कॅन्टोन्मेंटने बुधवारी अखेरची सर्वसाधारण सभा घेऊन सर्व नियुक्त सदस्यांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करून निरोप दिला. दरम्यान, आता बोर्डाचा कारभार द्विसदस्य समिती पाहणार आहे.
संरक्षण मंत्रालयाचे उपसचिव राजेशकुमार साह तसेच रक्षासंपदा महासंचालनालयाकडून मिळालेल्या आदेशानुसार देहूरोड कॅन्टोनमेंट बोर्ड एक वर्षासाठी बरखास्त करण्यात आले. ब्रिगेडियर संजय खन्ना यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सर्वसाधारण सभेत याबाबत माहिती देण्यात आली. यावेळी काही सदस्यांना भावना आवरता न आल्याने डोळ्यांत पाणी आले होते.