- भाजपकडून नितीन लांडगे, रवी लांडगे, भोईर, शत्रुघ्न काटे..
- राष्ट्रवादीकडून प्रवीण भालेकर, बनसोडे तर शिवसेनेकडून यादव..
- तर, अपक्ष आघाडीकडून पाडाळे या आठ सदस्यांची वर्णी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८. फेब्रुवारी २०२१) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीत भाजपचे नितीन लांडगे, रवी लांडगे, सुरेश भोईर, शत्रुघ्न काटे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवीण भालेकर, राजू बनसोडे शिवसेनेच्या मीनल यादव आणि अपक्ष आघाडीच्या नीता पाडाळे या आठ सदस्यांची वर्णी लागली आहे. गुरुवारी सर्वसाधारण सभेत या सदस्यांची निवड करण्यात आली.
पिंपरी-चिंचवड महापालिका फेब्रुवारी महिन्याची सर्वसाधारण सभा गुरुवारी आयोजित केली होती. महापौर उषा ढोरे सभेच्या अध्यक्षस्थानी होत्या. महापालिकेच्या स्थायी समितीत १६ सदस्य असतात. भाजपचे १०, राष्ट्रवादी काँग्रेसचे ४, शिवसेना १ आणि अपक्षांचा १ नगरसेवक संख्याबळानुसार स्थायी समितीत नियुक्त झाले आहेत.
भाजपचे सर्वाधिक १० सदस्य समितीत आहेत. त्यातील स्थायी समितीचे अध्यक्ष संतोष लोंढे, सदस्य आरती चौंधे, शीतल शिंदे, राजेंद्र लांडगे, राष्ट्रवादी काँग्रेसचे पंकज भालेकर, मयूर कलाटे, शिवसेनेचे राहुल कलाटे आणि भाजप संलग्न अपक्ष आघाडीच्या झामाबाई बारणे यांचा दोन वर्षाचा कार्यकाल २८ फेब्रुवारीला संपणार आहे.
सदस्यांचा कार्यकाल संपण्यापूर्वी नवीन सदस्यांची नियुक्ती करणे आवश्यक आहे. त्यानुसार आजच्या महासभेत नवीन आठ सदस्यांची नियुक्ती करण्यात आली. गटनेत्यांनी बंद पाकीटातून नावे दिली. त्यानंतर महापौर उषा ढोरे यांनी सदस्यांची स्थायी समितीत नियुक्ती झाल्याचे जाहीर केले.