- पालिकेचे सुमारे ७ हजार ११२ कोटी १ लाख रूपयांचे अंदाजपत्रक स्थायी सभेत सादर…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८. फेब्रुवारी २०२१) :- पिंपरी चिंचवड शहराला भविष्यातील सर्वाधिक पसंतीचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे राहण्यायोग्य शहर बनविण्याचा मानस असून त्यादृष्टीने शहरात नागरिकांच्या मुलभूत गरजांना प्राधान्य देऊन विकासकामे आणि उपक्रम राबवणार असल्याचे मत आयुक्त राजेश पाटील यांनी व्यक्त केले.
शहराला आंतरराष्ट्रीय दर्जाचे मापदंड तसेच संयुक्त राष्ट्राने शहर विकासासाठी निर्धारित केलेल्या मानांकनानुसार नागरिकांना सर्व सोयी सुविधा तसेच आवश्यक त्या उपाययोजना उपलब्ध करून देण्यासाठी महापालिका प्रयत्नशील राहील असेही आयुक्त राजेश पाटील यांनी स्पष्ट केले.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे सन २०२०-२१ चे सुधारीत व सन २०२१-२२ चे केंद्र व राज्य शासनाच्या योजनांसह सुमारे ७ हजार ११२ कोटी १ लाख रूपयांचे अंदाजपत्रक आयुक्त राजेश पाटील यांनी स्थायी समिती सभापती संतोष लोंढे यांच्याकडे आज स्थायी समिती सभेत सादर केले, त्यावेळी आयुक्त पाटील बोलत होते.
सन २०२१-२२ या आर्थिक वर्षात ५ हजार ५८८ कोटी ७८ लाख (आरंभीच्या शिल्लकेसह) उत्पन्न अपेक्षित आहे. यामध्ये प्रत्यक्ष खर्च ५ हजार ५८६ कोटी ३५ लाख होऊन मार्च २०२२ अखेर २ कोटी ४३ लाख शिल्लक राहील असा अंदाज आहे. मनपाच्या वतीने करण्यात येणा-या विविध विकासकामांसाठी १ हजार ६३० कोटी इतक्या भरीव रकमेची तरतूद केली आहे. क्षेत्रीय स्तरावरील विकासकामांसाठी अ, ब, क, ड, इ, फ, ग, ह, या क्षेत्रीय कार्यालयांसाठी अनुक्रमे ३२ कोटी ३२ लाख, ६८ कोटी २ लाख, ७० कोटी ५५ लाख, २५ कोटी २७ लाख, ४२ कोटी ९४ लाख, २९ कोटी ४७ लाख, २४ कोटी ७ लाख, ३८ कोटी ८९ इतकी तरतूद करण्यात आली आहे.
शहरी गरिबांसाठी केलेली १ हजार २१४ कोटी २९ लाख तरतूद, महिलांच्या विविध योजनांसाठी केलेली ५३ कोटी ३७ लाख तरतूद, दिव्यांग कल्याणकारी योजनांसाठी केलेली ३८ कोटी ५६ लाख तरतूद, स्वच्छ भारत मिशनसाठी केलेली १ कोटी तरतूद, स्मार्ट सिटीसाठी केलेली १०० कोटी तरतूद, प्रधानमंत्री आवास योजनेसाठी केलेली ४९ कोटी तरतूद, अमृत योजनेसाठी केलेली ६३ कोटी ८३ लाख ची तरतूद हि या वर्षीच्या अंदाजपत्रकाची खास वैशिष्ट्ये आहेत.
२०२१-२२ या आर्थिक वर्षात पिंपरी वाघेरे येथे छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारणे, बो-हाडेवाडी येथे छत्रपती श्री संभाजी महाराज यांचा १०० फुटी पुतळा उभारणे, चिखली जाधववाडी येथे माध्यमिक शाळा इमारत बांधणे, थेरगांव येथे बहुउद्देशीय इमारत उभारणे आणि दवाखाना इमारत बांधणे, नागरवस्ती विकास योजनेमार्फत स्त्री संसाधन केंद्र उभारणे, नदी पुनरुज्जीवन प्रकल्प राबविणे, मोशी येथे बहुउद्देशीय स्टेडियम बांधणे, चिखली येथे हॉस्पिटल बांधणे, सांगवी-किवळे रस्त्यावरील पुनावळे येथे बास्केट ब्रिजला समांतर पुल बांधणे, भोसरी पुलाखाली आणि एम्पायर इस्टेट पुलालाखालील परिसर अर्बन स्ट्रीट नुसार विकसित करणे यांसारख्या महत्वपूर्ण प्रकल्पांसाठी तरतूद उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
















