महापौर माई ढोरेंकडून महासभा सोमवारपर्यंत तहकूब…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८. फेब्रुवारी २०२१) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेची फेब्रुवारी महिन्याची सर्वसाधारण सभा आज (गुरुवारी) आयोजित केली होती. महापौर उषा ढोरे सभेच्या अध्यक्षस्थानी होत्या. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीतून निवृत्त होणाऱ्या नगरसेवकांची निवड करण्याच्या मुद्द्यावरून शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे व नवनाथ जगताप यांनी आक्रमक होत सभागृह दणाणून सोडले.
स्थायी समितीतून निवृत्त होणाऱ्या आठ सदस्यांच्या जागेवर नवीन नगरसेवकांची निवड करण्याचा विषय आज गुरूवारी सर्वसाधारण सभेपुढे होता. सभेला सुरूवात झाल्यानंतर स्थायी समितीवर निवड केलेल्या भाजपच्या चार, राष्ट्रवादीच्या दोन, शिवसेनेच्या एक नगरसेवकांच्या नावांचे वाचन करण्यात आले. त्यानंतर अपक्ष नगरसेवकांपैकी एका नगरसेवकाची निवड करण्याची प्रक्रिया सुरू झाली. अपक्षांचे गटनेते कैलास बारणे हे सभेला अनुपस्थित होते. त्यांनी स्थायी समितीवर अपक्ष नगरसेविका नीता पाडाळे यांचे नाव असलेले बंद पाकीट स्वतः पाडाळे यांच्याकडे दिले होते. हे बंद पाकीट पाडाळे यांनी महापौरांकडे दिले.
त्याला शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांनी आक्षेप घेतला. अपक्षांचा गटनेता नसल्यामुळे त्यांनी दिलेले बंद पाकीट ग्राह्य कसे धरता, असा सवाल करत सभागृहात डोक्यावर घेतले. अपक्षांचा गटनेता नसला तरी महापौरांना स्थायी सदस्यांची निवड करण्याचा कायदेशीर अधिकार असल्याचे सांगत नगरसचिव उल्हास जगताप यांनी नियम वाचून दाखविले. मात्र कलाटे शांत न झाल्याने महापौर माई ढोरे यांनी ही सभा सोमवारपर्यंत तहकूब केली.
















