- कासारवाडीत दोन हजार ८९६ चौरस मीटर क्षेत्रफळाचे बांधकाम उध्वस्त…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० फेब्रुवारी २०२१) :- कासारवाडी प्रभाग क्रमांक ३० ‘ ह ‘ प्रभाग कार्यक्षेत्रामध्ये २५ व्यावसायिक पत्राशेडपैकी २० अनधिकृत पत्राशेड बांधकामांवर कारवाई करण्यात आली. यामध्ये सुमारे दोन हजार ८९६ चौरस मीटर क्षेत्रफळ एवढे बांधकाम पाडण्यात आले. कारवाई वेळी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.
नदीपात्र परिसरातील मोठी कारवाई असल्याने भोसरी पोलीस विभागातील फौजफाटा तैनात करण्यात आला होता. कारवाईला राजकीय वळण प्राप्त झाल्याने काही काळ तणाव निर्माण झाल्याचे दिसून आले. तब्बल पन्नास पोलीस कारवाई वेळी तैनात होते. दोन पोकलेन व पोलीस वाहने उभी होती.
यावेळी कासारवाडी येथील पाण्याची टाकी परिसर, रेल्वे स्टेशन परिसर, सरिता संगम सोसायटीसमोर ,किनारा हॉटेलशेजारी, ‘ ह ‘ प्रभाग कार्यालयासमोर कारवाई करण्यात आली. काही नागरिकांनी स्वत:हून आपले अतिक्रमण हटविले.
याप्रसंगी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली, उपअभियंता राजेंद्र डुमरे, कनिष्ठ अभियंता वंदना मोरे यांनी कारवाई केली. भोसरी विभागातील पोलीस निरीक्षक व सहायक पोलीस निरीक्षक या वेळी उपस्थित होते.