- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अर्थसंकल्पात मेट्रोसाठी तरतूदच नाही…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० फेब्रुवारी २०२१) :- महापालिकेच्या सन २०२० – २१ च्या अर्थसंकल्पात मेट्रोसाठी ५० कोटींची तरतूद करण्यात आली होती. यंदाच्या सन २०२१-२२ अर्थसंकल्पास मेट्रोसाठी कोणतीही तरतूद न करता त्या महत्वपूर्ण प्रकल्पास थेट डच्चू देण्यात आला आहे. त्यामुळे पालिका प्रशासन मेट्रो मार्गासाठी उदासीन असल्याचे स्पष्ट होत आहे.
शहरात दापोडीच्या हॅरिस पुल ते चिंचवड मदर टेरेसा उड्डाणपुल असे ७.५० किलोमीटर अंतराच्या मेट्रो मार्गाचे काम अंतिम टप्प्यात आले. हे काम केंद्र व राज्य शासन तसेच, पालिकेच्या निधीतून महामेट्रोकडून केले जात आहे.
पिंपरी ते निगडीच्या भक्ती – शक्ती समुह शिल्प चौकापर्यंतच्या ४.४१ किलोमीटर अंतराच्या वाढीव खर्चास राज्य शासनाच्या मंत्रिमंडळ बैठकीत बुधवारी (दि. १७) मान्यता देण्यात आली आहे. तसेच, नाशिक फाटा ते चाकण मेट्रो मार्गाचा डीपीआर बनविण्याचे काम सुरू आहे. अर्थसंकल्पात मेट्रोसाठी निधीची तरतूद केलेली नाही. गरज पडल्यास निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे सांगत आयुक्त राजेश पाटील यांनी सारवासारव केली.