- पालिकेच्या भोसरी रुग्णालयात शिवजयंती साजरी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० फेब्रुवारी २०२१) :- छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेतील सर्वसामान्य शेतकरी केंद्रबिंदू मानून काम केले. परकीय आक्रमण रोखण्यासाठी, रयतेच्या रक्षणासाठी अल्पावधीत स्वतंत्र आरमाराची उभारणी छत्रपती शिवाजी महाराजांनी केली. तसेच ‘शककर्ते’ म्हणून महाराज ओळखले जातात. त्यांच्या राज्याभिषेकाच्या अगोदर त्यांनी लिहिलेल्या पत्रात ते म्हणतात रयतेतील सर्वांच्या जीवीताचे, मालमत्तेचे रक्षण झाले पाहिजे.
शस्त्राच्या बळावर सैन्याने रयतेची लुट करता कामा नये. कष्टकरी शेतक-यांकडून शेतसारा अमानुषपणे वसूल केला जात होता, तो महाराजांनी बंद केला. रयतेतील सर्व घटकांचा विचार करुन त्यांनी राज्य कारभार केला. म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांना ‘रयतेचा जाणता राजा’ म्हटले जाते असे प्रतिपादन नगरसेवक ॲड. नितीन लांडगे यांनी केले.
शिवजयंतीनिमित्त शुक्रवारी (दि. १९ फेब्रुवारी) भोसरी रुग्णालय येथे ॲड. लांडगे यांच्या हस्ते शिवप्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी डॉ. शिवाजी ढगे, डॉ. ज्ञानेश पाटील, परिचारीका मीना शिंगाडे आदी उपस्थित होते.


















