- महापालिकेकडून परिसर सील
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ फेब्रुवारी २०२१) :- कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने प्रशासनाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. मात्र, चिंचवडमधील एका सोसायटीत बुधवारी ११ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले त्यामुळे सोसायटीचा परिसर सील केला असून, दुसऱ्या टप्प्यातील पहिला मायक्रो कंटेन्मेट झोन तयार करण्यात आला आहे.
कोरोनाचा आलेख नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारीत कमी झाला होता. आता फेब्रुवारीच्या दुस-या आठवड्यात कोरोनाचा विळखा वाढू लागला आहे. चिंचवडमधील या सोसायटीत शंभर सदनिका आहेत. या ठिकाणी एका नागरिकाला कोरोना झाला होता. त्याच्या संपर्कात आलेल्या नागरिकांची तपासणी केली असता, अकरा जण पॉझिटिव्ह आढळले आहेत.
आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे, वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा डांगे यांनी सायंकाळी या भागाची पाहणी करून परिसर सील केला. तसेच पॉझिटिव्ह आलेल्या नागरिकांच्या संपर्कातील नागरिकांची कॉन्टक्ट ट्रेसिंग करण्याचे काम सुरू केले आहे.