- चोरीच्या घटना रोखण्यासाठी कामगारांची पोलिस पडताळणी…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ फेब्रुवारी २०२१) :- कंपन्यांना वेठीस धरून कंत्राट मिळविण्याचा प्रयत्न करणाऱ्यांची गय केली जाणार नाही. त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिला. चाकण एमआयडीसीतील कंपनीचे प्रतिनिधी आणि म्हाळुगे पोलिस यांची संयुक्त बैठक शुक्रवारी (दि. २६) पार पडली, या वेळी ते बोलत होते.
सहाय्यक पोलिस आयुक्त राम जाधव, पोलिस निरीक्षक अरविंद पवार, पोलिस निरीक्षक अशोक राजपूत, गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक शंकर बाबर, सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांच्यासह कंपन्यांचे पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी कृष्ण प्रकाश म्हणाले की, एमआयडीसी परिसरात भयमुक्त वातावरण राहण्यासाठी पोलिसांकडून विशेष भर दिला जाईल. स्थानिकांनी कंत्राट मिळवण्यासाठी कंपनीवर दबाव टाकू नये, अन्यथा त्यांची गय केली जाणार नाही. कंपन्यांमध्ये होणा-या चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी कंपनीतील सुरक्षारक्षकांची संख्या वाढवायला हवी. कंपनी परिसरात चांगल्या प्रतीचे सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, अशी सूचना आयुक्तांनी केली.
अरविंद पवार म्हणाले, कंपन्यांमध्ये होणाऱ्या चोरीच्या घटनांमध्ये अनेकदा कंपनीतील कामगारांचा सहभाग असतो. त्यामुळे कंपनी व्यवस्थापनाने कामगारांची पोलिस पडताळणी करावी.