- प्रशासकीय इमारतीच्या दुरूस्तीसाठी पावणेदोन कोटींची उधळपट्टी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२. मार्च. २०२१) :- पिंपरी – चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या आकुर्डी येथील प्रशासकीय इमारतीच्या दुरूस्तीसाठी पावणेदोन कोटी रुपयांचा खर्च करण्यात येणार आहे. इमारत उभारून अवघी ९ वर्षे झाली आहेत. प्राधिकरणाच्या सात मजली इमारतीच्या रंगरंगोटीचे काम हाती घेण्यात आले आहे. इमारतीला आतून – बाहेरून रंगरंगोटी केली जात आहे.
त्याशिवाय, प्राधिकरण इमारतीसमोरील मोकळ्या जागेत बगीचा विकसित केला आहे. दरवाजे, टाईल्स, पेव्हींग ब्लॉक आदींची किरकोळ दुरूस्तीची कामे सुरू केली आहेत. इमारतीसमोर या २ हजार ५०० चौरस मीटर जागेत खुल्या पार्किंगची व्यवस्था करण्यात येणार आहे.
इमारत दुरूस्तीचे काम पूर्ण करण्यासाठी ३ मार्च २०२१ पर्यंत मुदत होती. मात्र, लॉकडाऊन काळात काम न झाल्याने ३ सप्टेंबर २०२१ पर्यंत काम पूर्ण करण्यासाठी मुदतवाढ दिलेली आहे. या कामासाठी १ कोटी ७७ लाख रुपये इतका खर्च करण्यात येणार आहे. प्राधिकरणाची इमारत २०१२ मध्ये बांधण्यात आली. दहा वर्षांच्या इमारतीच्या अंतर्गत दुरूस्तीची कामे हाती घेण्यात आली आहेत.


















