- चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०३. मार्च. २०२१) :- निगडी वाहतूक शाखेतील एक वाहतूक पोलीस मंगळवारी सायंकाळी स्पाईन रोड चिखली येथे जाधव सरकार चौकात कर्तव्य बजावत होते. वाहतुकीचे नियम न पाळणा-या तसेच विनामास्क वाहन चालकांवर कारवाई करत होते. सायंकाळी साडेपाच वाजता होंडा झॅज कार (एम एच ५० / एल २२१६) मधून आरोपी आला.
तो स्वतः अंधेरी वेस्ट, मुंबई येथे सहाय्यक पोलीस आयुक्त पदावर कार्यरत असल्याची त्याने फिर्यादी यांना बतावणी केली. तसेच त्याने त्याचे बनावट ओळखपत्र दाखवले. तेच ओळखपत्र टोल नाक्यावर दाखवून त्याने शासनाची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
प्रवीण लक्ष्मण सूर्यवंशी (वय ३३, रा. मल्हारपेठ, ता. कराड, जि. सातारा) असे बनावट ओळखपत्र बाळगणा-या आरोपीचे नाव आहे. त्याच्या विरोधात याबाबत चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत वाहतूक पोलीस सुनील गायकवाड यांनी फिर्याद दिली आहे. याबाबत भारतीय दंड विधान कलम ४६८, ४७१, ४२०, १७०, १७१ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चिखली पोलीस तपास करीत आहेत.