न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० डिसें.) :- गेल्या नोव्हेंबर महिन्यात तहकूब झालेली सर्वसाधारण सभा आज गुरुवार (दि. २०) रोजी महापौर राहूल जाधव यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. सुरुवातीलाच शिक्षक वर्गीकरण प्रस्तावाबाबत विरोधी पक्षांनी चर्चा करण्याची मागणी केली. मात्र सत्ताधारी भाजपने चर्चा टाळून विषयपत्रिकेवरील पुढील क्रमांकाचा विषय घेतला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने हरकत घेऊन अध्यक्षाच्या दालनात उडी घेतली. त्यामुळे सभा काही काळापर्यंत तहकूब करण्यात आली होती. तहकूब सभा पूर्वरत सुरु झाली. शहरात एलईडी दिवे बसविण्यासाठी राज्य शासनाने ईईएसएल संस्थेसोबत करार केल्याने याच संस्थेला हे काम देण्याच्या विषयाला सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवकांसह राष्ट्रवादी, शिवसेना, मनसेच्या नगरसेवकांनी कडाडून विरोध केला आहे.
या प्रस्तावास विरोध करताना विरोधी पक्षनेते दत्ता साने म्हणाले की, या विषयाला आमचा विरोध असून, हा विषय मंजुरच करायचा असेल तर, सर्व नगरसेवकांचे मतदान घ्या. मतदान घेतल्याशिवाय हा विषय मंजूर करू देणार नाही. एलईडीबाबत प्रशासनाने अहमदाबादचा दौरा केला. त्याचा अहवाल प्रशासनाने सादर करावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
तुषार कामठे म्हणाले, गेल्या तीन महिन्यांत जेवढ्या निविदा निघाल्या. त्याचे दर वाढीव आहेत. या विषयात ५० कोटींची बचत होत असेल तर, हे एलईडीचे काम संबंधित संस्थेला देण्यात येऊ नये. एखाद्या निविदेचे दर १९ टक्के अबोव्ह असतात. याची चौकशी करण्यात यावी.
मंगला कदम म्हणाल्या, हा विषय दप्तरी दाखल करण्यात यावा. तीन वर्षांच्या फाईली पडून असतात. मग हा विषय कितीवेळा सभागृहासमोर आणायचा.
नगरसेवक संदीप वाघेरे म्हणाले की, सात वर्षाचा करार करून ईईएसएल संस्थेला साडेदहा कोटी रुपये दर वर्षाला आपण देणार आहोत. पालिकेला आर्थिक सुबत्ता लाभली म्हणून पैशे कुठेही खर्च करणे योग्य नाही. शेवटी या विषयाच्या विरोधात सभागृहाचे बहुमत झाल्याने हा विषय फेटाळून लावण्यात आला आहे.












