- कार्यालयीन अर्ज, टपालंच्या निपटाऱ्यासाठी आता झेड, झेड प्लस शेरांकन..
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०६ मार्च २०२१) :- पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये दररोज अनेक नागरिकांच्या तक्रारी येत असतात. या तक्रारींवर कारवाई करण्यासाठी आयुक्त राजेश पाटील यांनी डेडलाइन ठरवून दिली आहे. त्यानुसार टपालावर झेड मत आणि झेड प्लस असा शेरा देण्यात येणार आहे. त्यापैकी झेड शेरा असलेल्या टपालावर सात दिवसांत, तर झेड प्लस शेरा असल्यास ४८ तासांच्या आत विभागप्रमुखांनी कार्यवाही करावी, असा आदेश आयुक्तांनी दिले आहेत.
महापालिकेकडील विविध कामकाजाबाबत आयुक्त कार्यालयात पोस्टाद्वारे, ई – मेलद्वारे, शासन व अन्य माध्यमांकडून अर्ज किंवा टपाल प्राप्त होतात. या टपालावर महापालिका सारथी, आपले सरकार पोर्टलवरील तक्रारी, प्रकरणांवर कामकाजात होणारा विलंब टाळून सर्व प्रकारच्या प्रकरणांचा त्वरित निपटारा करणे. विशिष्ट कालावधीत प्रकरणे निर्गत करण्यासाठी आयुक्तांमार्फत शेरांकन करण्यात येत होते. प्रशासकीय कामकाजात गतिमानता येऊन नागरिकांकडून येणाऱ्या तक्रारीवर तात्काळ कार्यवाही व्हावी.
तक्रारी सोडविण्यासाठी यापुढे विभागाकडे येणाऱ्या टपालांवर झेड किंवा झेड प्लस असे शेरांकन केले जाणार आहे. त्यानुसार टपालाचे गांभीर्य लक्षात घेऊन विभागप्रमुखांनी झेड शेरांकन असलेल्या टपालावर कार्यालयीन कामकाजाच्या सात दिवसात, तर झेड प्लस शेरांकन असलेल्या टपालावर ४८ तासांच्या आत कार्यवाही करावी. तसेच मुदतीपूर्वी आयुक्तांकडे फाइल सादर करावी, असे आयुक्तांनी आदेशात नमूद केले आहे. प्रशासकीय गतीमानतेसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच, आवश्यक प्रकरणी व्हॉट्स अॅपद्वारे देखील टपाल संबंधितांकडे पाठविले जाणार आहे. निर्देशांचे मुदतीत पालन न झाल्यास संबंधितांवर नियमाधीन कारवाईचा इशाराही आयुक्तांनी आदेशात दिला आहे.
















