- वादग्रस्त अधिकाऱ्यांच्या विभागाची पुन्हा खांदेपालट…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०६ मार्च २०२१) :- महापालिकेचे उपायुक्त मंगेश चितळे यांच्याकडील वादग्रस्त ठरलेले मध्यवर्ती भांडार विभाग काढून घेऊन त्यांना उद्यान विभागाची जबाबदारी देण्यात आली. केवळ २० दिवसांत पुन्हा त्यात बदल करण्यात आला असून, त्यांच्याकडे आकाशचिन्ह व परवाना तसेच, दक्षता व गुण नियंत्रण विभागाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
या अचानक बदलीची चर्चा महापालिका वर्तुळात रंगली आहे. मावळते आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी चितळे यांच्याकडील भांडार विभाग काढून त्यांना उद्यान विभाग दिला होता. तसे, आदेश १२ फेब्रुवारीला काढले. तर, उद्यान विभागाचे उपायुक्त सुभाष इंगळे यांना प्रशासन विभाग देण्यात आला. प्रशासनाचे उपायुक्त मनोज लोणकर यांना भांडार विभाग सोपविला. हे बदल नवे आयुक्त राजेश पाटील यांनी केवळ २० दिवसांत अचानक रद्द केले.
चितळे यांना आकाशचिन्ह व परवाना विभाग दिला आहे. तर, उद्यान विभाग पूर्वीप्रमाणे इंगळेंकडे दिला आणि आहे. त्यांच्याकडे प्रशासन विभाग कायम आहे. तर, आकाशचिन्ह विभागाचे सहायक आयुक्त यांनी नीलेश देशमुख यांच्याकडे माहिती व जनसंपर्क आणि पशुवैद्यकीय विभाग देण्यात आला आहे. या विभागाची जबाबदारी घेतलेले व्यंकटेश दुर्वास यांनी सेवेचा राजीनामा दिल्याचे ती जागा रिक्त झाली होती.
















