न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ डिसें.) :- शिवसेना पक्षप्रमुख मा. उद्धवसाहेब ठाकरे यांची २४ डिसेंबर रोजी पंढरपूर येथे जाहीर सभा होणार आहे. या सभेत शिवसेना जोरदार शक्तिप्रदर्शन करणार आहे. मावळ लोकसभा मतदार संघातील तीन हजार शिवसैनिक मावळ आणि पिंपरी-चिंचवड परिसरातून वाहणा-या पाच नद्यांचे जल विठ्ठल चरणी अर्पण करून सभेत सहभागी होणार आहेत. याबाबतची नियोजन बैठक आज शुक्रवार (दि. २१) रोजी आकुर्डी येथील शिवसेना भवनात झाली.
खासदार श्रीरंग बारणे, आमदार गौतम चाबुकस्वार यांच्या मार्गदर्शनानुसार जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. जिल्हा संघटिका शादान चौधरी, शहर प्रमुख योगेश बाबर, शहर संघटिका ॲड. उर्मिला काळभोर, विधानसभा प्रमुख प्रमोद कुटे, अनंत को-हाळे, राजू खांडभोर, विधानसभा संघटिका सरिता साने, अनिता तुतारे, शैला खंडागळे आदींनी पुढील कामकाजाचे नियोजन केले.
मावळ तालुका प्रमुख राजू खांडभोर यांच्या संकल्पनेतून पिंपरी-चिंचवड आणि मावळ विधानसभा क्षेत्रातील वाहणा-या कुंडलिका, आंद्रा, सुधा, इंद्रायणी आणि पवना या पाच नद्यांचे पाणी विठ्ठल चरणी अर्पण करण्यात येणार आहे. त्यासाठी रविवारी (दि. २३) नाणे मावळ उकसान येथील कुंडलिका नदीतीरावर सकाळी आठ वाजता, टाकवे बुद्रुक येथील आंद्रा नदीतीरावर सकाळी नऊ वाजता, अंदरमावळ सुदवडी येथे सुधा नदीतीरावर सकाळी दहा वाजता, देहू येथे इंद्रायणी तीरावर सकाळी अकरा आणि श्री मोरया गोसावी मंदिर येथे दुपारी बारा वाजता विधिवत जलपूजन करून पाच नद्यांचे जल पंढरपूरला नेण्यात येणार आहे.
या माध्यमातून बळीराजा संकटातून मुक्त व्हावा, मा.उद्धवजी ठाकरे यांच्या संकल्पनेतील शिवशाहीचे राज्य यावे या सदभावनेतून विठ्ठल चरणी जल अर्पण करण्यात येणार आहे. या विराट सभेत पिंपरी-चिंचवड आणि मावळ विधानसभा क्षेत्रातील तीन हजार शिवसैनिक सहभागी होणार आहेत.










