- महिलेसह चार जणांना जिवे ठार मारण्याचा प्रयत्न..
- पोलिसांचा वचक हवेतच विरला?…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ मार्च २०२१) :- शहरात टोळक्यांकडून राडा घालण्याचे प्रकार सुरूच आहेत. दत्तनगर, चिंचवड येथे शुक्रवारी (दि. १९) रात्री टोळक्याने कोयते, लाकडी दांडक्याने मारहाण करून एका महिलेसह चार जणांना जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. यात खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी १४ आरोपींच्या विरोधात पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
प्रयल अजय थोरात, अजय कांबळे, दादा शिंदे, मुकूल कांबळे, काक्या शिंदे, राहुल कांबळे, दत्ता देवकर, प्रदीप गोणे, दिसल्य पप्या उर्फ सावंत, अभिजित गायकवाड, दशरथ पात्रे, सोन्या कांबळे, निहाल शेख, मोहसीन शेख, अशी आरोपींची नावे आहेत.
पहिल्या प्रकरणात सुरज बाबा मिसाळ (वय १८, रा. दत्तनगर) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी दुर्गामाता लाकडी चौकात थांबले होते. त्यावेळी आरोपी मोठमोठ्याने आरडाओरडा करून येत होते. फिर्यादीने त्यांच्याकडे पाहिले म्हणून आरोपींना राग आला आणि कोयता व लाकडी दांडक्याने वार केले. मात्र, ते वार चुकवून फिर्यादी गेले. त्यावेळी आरोपींनी त्यांना शिवीगाळ केली. तसेच फिर्यादीच्या दिशेने दगड फेकून मारले.
दुस-या प्रकरणात आरती अक्षय कोंडके (वय २२, रा. दत्तनगर) यांनी फिर्याद दिली. आरोपींनी फिर्यादीचा भाऊ सुरज याला जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याने त्याबाबत तक्रार करण्यासाठी फिर्यादी पोलिसांकडे जात होत्या. आरोपी दत्तनगर येथे दिसल्याने फिर्यादी यांनी त्यांच्याकडे विचारणा केली. तुम्ही माझ्या भावास का मारता, असे फिर्यादीने आरोपींना विचारले. तुझ्या भावाला ठार मारणार होतो, आता तुलासुद्धा सोडत नाही, तुला खल्लास करून टाकतो, असे आरोपी म्हणाले. आरोपींच्या हातातील लाकडी दांडके व कोयते पाहून फिर्यादी आरोपी भितीने तेथून पळून जाण्याच्या तयारीत असताना त्यांना जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने आरोपींनी दगड फेकून मारले.
















