- वाढत्या कोरोना रुग्णसंख्येचा पालिकेने घेतला धसका…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ मार्च २०२१) :- शहरातील कोरोनाची रुग्णसंख्या लक्षात घेऊन पालिका व खासगी रुग्णालयातील बेड विशेषत:ऑक्सिजन आणि व्हेंटीलेटरचे बेड फुल होत आले आहेत. खरबदारी म्हणून नेहरूनगर, पिंपरी येथील जम्बो रुग्णालयात येत्या ५ दिवसांत कार्यान्वित केले जाणार आहे. सध्या २०० बेड असून रुग्णसंख्या लक्षात घेऊन त्यात आणखी वाढ करण्याचा निर्णय महापालिकेचे गटनेते व पदाधिकाऱ्यांच्या सोमवारी (दि.२२) झालेल्या बैठकीत घेण्यात आला.
आढावा बैठकीच्या अध्यक्षस्थानी महापौर उषा ढोरे होत्या. या वेळी सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, स्थायी समिती अध्यक्ष नितीन लांडगे, मनसेचे गटनेते सचिन चिखले, अपक्ष आघाडी गटनेते कैलास बारणे, आयुक्त राजेश पाटील, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे उपस्थित होते.
शहरात दररोज चौदाशेच्या आसपास रुग्ण आढळत आहेत. पालिका व खासगी रुग्णालयातील एकूण बेडची संख्या २ हजार ९६९ आहे. त्यापैकी १ हजार ७१७ बेडवर रुग्ण उपचार घेत आहेत. केवळ १ हजार २५२ बेड उपलब्ध आहेत. त्यातील ५१९ बेड ऑक्सिजन नसलेले आहेत. त्यामुळे लवकरच आणखी बेड लागणार आहेत. त्यासाठी ८०० ऑक्सिजन बेड क्षमतेच्या जम्बो रुग्णालयातील २०० बेडची सुविधा सुरू करण्यात येणार आहे. त्यात ५० आयसीयू बेड, ५० हायपर ऑक्सिजन बेड आणि १०० ऑक्सिजन बेडचा समावेश आहे. ती सुविधा येत्या ५ दिवसांत सुरू केली जाईल. त्याचा सर्व खर्च पालिका उचलणार आहे, असे महापौर उषा ढोरे व पक्षनेते नामदेव ढाके यांनी सांगितले.
वायसीएममध्ये नॉन कोविड रुग्णांची संख्या अधिक आहे. पाचव्या व सहाव्या मजल्यावरील वॉर्डात कोविड रुग्ण ठेवले जाणार आहेत. ते कोविड रुग्णालय केले जाणार नसल्याने जम्बो रुग्णालयाचा पर्याय स्वीकारण्यात आल्याचे ढाके यांनी स्पष्ट केले. तसेच चिखली घरकुलात ४०० बेडचे कोविड केअर सेंटर सुरू केले आहे. सध्या ३५ ठिकाणी लसीकरण केंद्र असून, आवश्यकतेनुसार त्यात वाढ केली जाईल, असे त्यांनी सांगितले.
















