- तातडीने करावयाच्या खरेदीसाठी आता त्रीसदस्यीय समितीची नियुक्ती…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ मार्च २०२१) :- पिंपरी – चिंचवड महापालिका कोविडच्या अनुषंगाने तातडीने करत असलेल्या खरेदीची बिले तपासण्यासाठी महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी तीन सदस्यांची समिती नियुक्त केली असून या समितीच्या मान्यतेनंतरच यापुढे ठेकेदारांची बिले अदा करण्यात येणार आहेत.
या समितीच्या नियुक्तीला बुधवारी (दि. २४) मान्यता देण्यात आली आहे. यापूर्वी कोविड काळातील खरेदीवरून मोठा गदारोळ निर्माण झाला होता. तर भ्रष्टाचाराचेही आरोप झाले होते. भविष्यात असा प्रकार पुन्हा घडू नये यासाठी समिती नियुक्त करण्यात आली आहे.
या समितीमध्ये लेखाधिकारी जितेंद्र कोळंबे, कार्यकारी अभियंता शिरिष पोरेड्डी आणि डॉ. लक्ष्मण गोफणे यांचा समावेश आहे. या समितीच्या माध्यमातून संपूर्ण खरेदीवर लक्ष ठेवण्यात येणार असून बिले अदा करण्यापूर्वी त्याची तपासणी करण्यात येणार आहे. ठेकेदारांनी सादर केलेल्या कागदपत्रांचीही छाननी ही समिती करणार असून शासन निर्णय, महापालिका अधिनियमातील तरतुर्दीचे पालन झाले आहे का? ते देखील तपासले जाणार आहे.
















