- अत्यावश्यक खरेदीच्या नावाखाली पालिकेची अडीच कोटींची उधळपट्टी ?…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ मार्च २०२१) :- महापालिकेचे तत्कालीन आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी स्थायी समितीची माफी मागून थेट वह्या खरेदीचा विषय दप्तरी दाखल केला होता. मात्र, नव्या अधिकाऱ्यांमार्फत प्राथमिक व माध्यमिक शाळांसाठी सुमारे २ कोटी ५० लाख रुपयांच्या वह्या अत्यावश्यक खरेदीच्या नावाखाली खरेदी करण्यात येत आहेत.
माध्यमिक शाळांसाठी निविदा न राबविता पुनर्प्रत्येयी आदेशाने खरेदीचा पुरवठा आदेश देण्यात आला आहे. पालिकेच्या १०९ प्राथमिक शाळेत ४२ हजार विद्यार्थी आहेत. कोरोना संसर्गामुळे शाळा बंद असून, ऑनलाइन शिक्षण सुरू आहे. वह्या खरेदीची निविदा प्रक्रिया सन २०१६ मध्ये प्रसिद्ध केली होती. यातील पुरवठाधारकाचा सन २०१८-१९ पर्यंत करारनामा होता. मात्र, मागील वर्षी (२०१९ -२०) पालिका प्रशासनाने करारनामा रद्द केला. त्यानंतर संबंधित पुरवठाधारकासोबत नव्याने एक वर्षासाठी (२०१९ -२०) करारनामा केला. जुलै २०१९ मध्ये पुरवठा आदेश देण्यात आला. हा करारनामा व पुरवठा आदेश कोणत्या नियमांच्या आधारे देण्यात आला, असे करारनामे व आदेश कसे केले जातात, पुरवठा आदेशास – पुनर्प्रत्येयी आदेश म्हणता येतो का, असे प्रश्न स्थायी समिती सभेत उपस्थित झाल्याने तत्कालीन आयुक्त हर्डीकर यांनी सभागृहाची माफी मागून वह्यांसह पाठ्यपुस्तके खरेदीचा विषय दप्तरी दाखल केला होता.
दरम्यान, अत्यावश्यक खरेदीच्या नावाखाली पुन्हा वह्या खरेदीसह व्यवसायमाला पाठ्यपुस्तके खरेदीचा निर्णय घेण्यात आला आहे. प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये निविदा प्रक्रिया न राबविता पुनर्प्रत्येयी आदेशाने मागील दराने वह्या खरेदी करण्यात येत आहे. प्राथमिक शाळांसाठी २ लाख ५० हजार आणि माध्यमिक शाळांसाठी २ लाख २९ हजार २९८ वह्या असे सुमारे २ कोटी ५० लाखांची खरेदी आहे. वह्या खरेदीची नियमावली नाही. त्यामुळे कोरोनाच्या नावाखाली शाळा बंद असतानाही कोट्यवधींची वह्या व पाठ्यपुस्तके नियमबाह्य पद्धतीने खरेदीचा घाट करीत असल्याची चर्चा पालिका प्रशासन वर्तुळात आहे.
















