- प्रा. दत्तात्रय भालेरावांचा पालिकेच्या आरोग्य विभागाकडे पाठपुरावा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ मार्च २०२१) :- करोनाचा फैलाव रोखण्यासाठी सरकारी यंत्रणा शर्थीचे प्रयत्न करत असतानाच, नागरिकांनीदेखील समंजसपणा दाखवावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. अनेक गृहनिर्माण संस्थादेखील सरकारच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करत, करोनाला आपल्या सोसायटीच्या दाराबाहेरच ठेवण्यासाठी सजग आहेत. पिंपरीतील म्हाडा कॉलनी परिसरातदेखील कोविड रुग्णांची संख्या वाढत आहे.
या अनुषंगाने करोनापासून सभासदांचे रक्षण करण्यासाठी शिवसेनेचे भोसरी विधानसभा समन्वयक प्रा. दत्तात्रय भालेराव यांनी पालिकेच्या आरोग्य विभागाकडे पाठपुरावा केला. सोसायटीच्या इमारती सॅनिटाईझ करून घेतल्या. संकुलात प्रवेश करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीस सॅनिटायझरने हात स्वच्छ केल्याशिवाय प्रवेश दिला जात नाही.
इमारतीचे आतील भागाचे पॅसेज, जिना, रेलिंग, लिफ्ट, फ्लॅटच्या दारांचे सोडियम हाइपोक्लोराइटद्वारे निर्जंतुकीकरण करण्यात आले. या कामात सोसायटीच्या सर्वच सभासदांचा सक्रिय सहभाग मिळाला.
पिंपरी चिंचवड शहरात दररोज अठराशे पेक्षा अधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळत आहेत. आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जात असताना सामूहीक प्रयत्नांची गरज असते. त्यामुळे उत्तम समन्वय ठेवून पालिका प्रशासनाकडून प्रभावीपणे कामकाज व्हावे. नागरिकांनी कोरोना विषाणू संदर्भात कोणत्याही प्रकारच्या अफवांना बळी पडू नये तसेच घाबरून जाऊ नये. महापालिकेने वेळोवेळी केलेल्या आरोग्य विषयक सूचनांची अंमलबजावणी करावी आणि आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी.
प्रा. दत्तात्रय भालेराव, शिवसेना भोसरी विधानसभा समन्वयक….
















