- संशोधन आणि विकासकेंद्र विकसित होण्यास मदत…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ मार्च २०२१) :- पिंपरी – चिंचवड महापालिकेच्या हद्दीतील चिखली येथे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे विस्तार केंद्र उभारण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिल्याने गेल्या अनेक वर्षांपासून मंजुरीच्या प्रतिक्षेत असलेल्या विस्तार केंद्राचा विषय मार्गी लागला आहे.
पुढील तीन वर्षांत हे केंद्र उभारले जाणार आहे. पुण्यातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे विस्तार केंद्र चिखली येथील ११.३० हेक्टर जागेवर उभारण्याचा प्रस्ताव गेल्या अनेक वर्षांपासून शासन स्तरावर मान्यतेच्या प्रतिक्षेत होता. शासनाने विस्तार केंद्रासाठी राखीव ठेवलेल्या जागेवर उत्कृष्टता व विकासकेंद्र तसेच संशोधन आणि नाविन्यता पार्क सुरू करण्यासंदर्भातील प्रस्ताव पाठविण्यात आला होता.
बुधवारी (दि. २४) झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली. हे केंद्र उभारण्यासाठी येणाऱ्या १५० कोटी रुपयांच्या खर्चालाही यावेळी मान्यता देण्यात आली. या केंद्रांद्वारे प्रस्तावित सर्व अभ्यासक्रम हे कायम विना – अनुदानित व स्वयंअर्थसहायित तत्वावर संस्थेमार्फत चालविण्यात येणार आहेत.
















