- ५ हजार रेमडिसिव्हीर इंजेक्शन खरेदीस स्थायीचा हिरवा कंदील…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ मार्च २०२१) :- करोनाबाधित रुग्णांवरील उपचारासाठी रेमडिसिव्हीर इंजेक्शनची आवश्यकता निर्माण झाली आहे. पालिकेच्या रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांना रेमडिसिव्हीर मोफत दिले जाणार आहे. त्यासाठी पालिकेने तसेच १ हजार रेमडिसिव्हीर खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. तर त्यासोबतच आणखी ५ हजार करोना रेमडिसिव्हीर इंजेक्शन थेट पद्धतीने घेऊन खरेदी केले जाणार आहे. त्याला स्थायी समितीच्या बैठकीमध्ये आयत्यावेळी मंजुरी देण्यात आली.
करोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असल्याने गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. करोनाला प्रतिबंध घालण्यासाठी महापालिकेकडून आवश्यक दक्षता घेण्यात येत आहे. महापालिकेची विविध रुग्णालये तसेच कोरोना रुग्णालयांमध्ये करोनाबाधित रुग्णांवर वैद्यकीय उपचार करण्यात येत आहेत. करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन त्याचा मुकाबला करण्यासाठी तातडीने रेमडिसिव्हीर १०० एमजी या इंजेक्शनची आवश्यकता आहे. १०० एमजीच्या पाच हजारकुपी (व्हायल्स) तातडीने नाशिक येथील गेटवेल डिस्ट्रीब्युटर्स यांच्याकडून थेट पद्धतीने खरेदी करण्यात येणार आहेत. जीएसटीसह ६६६.४० रुपयांना एक कुपी खरेदी केली जाणार आहे. त्यासाठी येणाऱ्या ३३ लाख ३२ हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समितीने आयत्यावेळी मान्यता दिली.
रुग्णांवरील या उपचारासाठी रेमडिसिव्हीर इंजेक्शन खरेदी अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी यांनी १६ मार्च तर, वायसीएमएचचे अधिष्ठाता यांनी २२ मार्च २०२१ रोजी पत्राद्वारे मागणी केली आहे. त्यानुसार तातडीने महापालिकेच्या पुरवठाधारकांकडून आपत्कालीन परिस्थितीत पत्र देऊन दरपत्रके मागविण्यात आली. त्यापैकी तुलनात्मक लघुत्तम पुरवठाधारक गेटवेल डिस्ट्रीब्युटर्स यांचा रक्कम रुपये ५९५ जीएसटीसह ६६६.४० प्रति कुपी (व्हायल्स) असा दर प्राप्त झाला आहे. त्यानुसार त्यांच्याकडून थेटपद्धतीने पाच हजार कुपी खरेदी करण्यात येणार आहे. त्यासाठी येणाऱ्या ३३ लाख ३२ हजार रुपयांच्या खर्चास समितीने आयत्यावेळी मान्यता दिली.
















