- जेएसपीएम; शाहू इंजी. कॉलेज, बसवंत बिल्डर्ससह आदींचा समावेश…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ मार्च २०२१) :- शहरातील २५ लाखांपेक्षा अधिक थकबाकी असलेल्या एकूण ३२५ थकबाकीदारांना महापालिकेच्या कर संकलन कार्यालयाने नोटिसा बजावल्या होत्या. तरीही, प्रतिसाद न देणाऱ्या ३५ थकबाकीदारांच्या मिळकतीवर कारवाई करीत त्या सील करण्यात आल्या आहेत. कारवाईची ही मोहीम आता अधिक तीव्र केली जाणार आहे, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
शहरातील ५ लाख ३० हजार २७८ मालमत्तांची नोंद पालिकेकडे आहे. त्यापैकी ३२५ मोठ्या थकबाकीदारांना पालिकेने जानेवारीत जप्तीपूर्वनोटिसा बजावल्या आहेत. त्यात बिगरनिवासी मिळकती, शैक्षणिक संस्था, खासगी कंपन्या, आस्थापना,रुग्णलय, बांधकाम व्यावसायिक, शॉपिंग मॉल आदींचा समावेश आहे.
वारंवार तगादा लावूनही थकबाकीदारांनी प्रतिसाद न दिल्याने पालिकेच्या कर संकलन विभागाने धडक कारवाई मोहीम हाती घेतली आहे. तसा स्पष्ट इशारा आयुक्त राजेश पाटील यांनी दिला आहे. आतापर्यंत २० कोटी रुपयांचा कर जमा झाला आहे. गेल्या दोन महिन्यांमध्ये ३५ मिळकती सील करण्यात आल्या आहेत. यामध्ये शहरातील बड्या संस्थांचा समावेश आहे.
गुलशन हॉटेल, जयवंत द इन्स्टिट्यूट ऑफ कॉम्पुटर अॅप्लीकेशन, जयवंत शिक्षण प्रसारक मंडळाचे वसतिगृह व स्टाफ क्वार्टर, राजर्षी शाहू कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, माईन्ड स्पेश हॉटेल, बसवंत बिल्डर्स, डायनामिक लॉजिस्टिक, ब्लॉसम पब्लिक स्कूल, जोशी इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स या थकबाकीदारांचा समवेश आहे. थकबाकीचा भरणा जोपर्यंत केला जाणार नाही, तोपर्यंत सील उघडले जाणार नाही, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. अवैध बांधकाम शास्तीधरून १७ कोटी ९५ लाख रुपये थकीत रक्कम आहे. त्यापैकी ३ कोटी ३४ लाख ४३ हजार ९३१ रुपये वसूल करण्यात आले आहेत. दरम्यान, थकबाकीदारांची यादी पालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. तसेच, थकबाकीदारांच्या नावांचे फलक लावण्यात आले आहेत.
मोठ्या थकबाकीदारांवर कारवाई केली जात आहे. नोटीस दिल्यानंतर मुदतीमध्ये संपूर्ण थकबाकी भरणे अपेक्षित आहे. यापुढे कारवाई मोहिम वाढविण्यात येणार आहे. तशा सूचना क्षेत्रीय अधिकाऱ्यांना आयुक्तांनी दिल्या आहेत. सर्व १६ करसंकलन कार्यालय साप्ताहिक व सार्वजनिक सुटीच्या दिवशी सुरू राहणार आहेत. तेथे बिले स्वीकारली जाणार आहेत, नागरिकांनी बिले जमा करून पालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन कर संकलन विभागाच्या उपायुक्त स्मिता झगडे यांनी केले आहे. तर, दुसरीकडे मोकळ्या जागा जप्त करून त्याचा लिलाव केला जाणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
















