- अतिष बारणेंच्या समाजोपयोगी कामांचे पवारांकडून कौतुक…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ मार्च २०२१) :- शहर राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष अतिष बारणे यांच्यासह इतर कार्यकर्त्यांनी दिल्ली येथे जाऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांची भेट घेतली. यावेळी कोरोना काळातील आणि इतर समाजोपयोगी कार्याचा अहवाल सादर करण्यात आला. या अहवालातील कार्यावर चर्चा करून शरद पवार यांनी कौतुकही केले. युवापर्वाकडून आपल्याला असेच कार्य़ अपेक्षित असल्याच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या.
मोशी परिसरामध्ये युवावर्गाची फळी तयार करून विविध समाजोपयोगी कार्य़क्रम राबवत पक्षाची प्रतिमा उंचावण्याचे काम आतिष बारणे आणि त्यांच्या सहकार्यांनी केले आहे. नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी आणि इतर सुविधा त्यांना मिळाव्या यासाठी मोशीमध्ये सुसज्ज असे जनसंपर्क कार्यालय उभे केले आहे. आतिष बारणे यांच्या विविध उपक्रमाबद्दल अनेक जेष्ठ नेत्यांनी कौतुक केले आहे. खासदार डॉ.अमोल कोल्हे, आमदार विलास लांडे आणि इतर जेष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली बारणे यांनी शहरामध्ये कौतुकास्पद उपक्रम राबविले आहेत. पर्यावरण संवर्धन, पाणीप्रदूषण, रस्ते, वीज, भव्य रक्तदान शिबिर, कोविड-१९ मध्ये नागरिकांना अन्नधान्य ते चाचण्यापर्यंत मोठे कार्य केले. पिंपरी-चिंचवड शहरातून प्रशासनाच्या सहकार्यासाठी चार रूग्णवाहिकेचे लोकार्पण करणारे एकमेव युवा कार्यकर्ते म्हणून बारणे यांच्याकडे पाहिले जाते. अशा विविध कार्याचा अहवाल शरद पवार साहेबांनी पाहून कौतुक केले.
शरद पवार यांनी पिंपरी-चिंचवड शहरातील सध्याची कोविड-१९ ची परिस्थिती याबद्दलही आढावा घेतला. तसेच शहरातील विविध विकासकामांबद्दल चर्चा करून,राजकीय मार्गदर्शन करून, बारणे यांच्या पुढील राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छाही दिल्या.
राजकारणातील अनुभव सांगताना आणि मार्गदर्शन करताना, साहेब म्हणाले, तरूणांच्या हाती नेतृत्व आले पाहिजे. त्यांना वाव मिळाला पाहिजे. त्याची गरज आहे. युवा नेतृत्वाची फळी उभारण्याची गरज आहे. त्यादृष्टीने कामकाज सुरु आहे. पक्ष कुठलाही असो युवा चेहऱ्यांना राजकारणात प्रोत्साहन मिळाले पाहिजे, अशा भावना शरद पवार यांनी यावेळी व्यक्त केल्या.
















