- हिंजवडी, सांगवी, वाकड पोलीस ठाण्यास गुन्हे दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ मार्च २०२१) :- वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सराईत गुन्हेगार सुनील विश्वनाथ ठाकूर याच्या टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम १९९९ (मोक्का) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. घातक शस्त्रांनी दहशत माजवून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणे तसेच इतर सात गंभीर गुन्हे या टोळीवर दाखल आहेत.
सुनील विश्वनाथ ठाकूर (वय २३, रा. थेरगाव), विजय राहुल तलवारे (वय १९ रा. रहाटणी), अशी आरोपींची नावे आहेत. यातील ठाकूर हा टोळीप्रमुख आहे. जबर दुखापत करणे, जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणे, बेकायदेशीर जमाव जमवून घातक शस्त्रांनी दहशत निर्माण करणे, असे एकूण सात गुन्हे हिंजवडी, सांगवी व वाकड पोलीस ठाण्यास दाखल आहेत.
पोलीस उपायुक्त आनंद भोईटे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विवेक मुगळीकर, सहायक फौजदार सुहास पाटोळे, पोलीस कर्मचारी सचिन चव्हाण यांनी ही कारवाई केली. आरोपींनी संघटित गुन्हेगारी टोळी बनवून हिंसाचार करून वर्चस्वासाठी आर्थिक फायद्यासाठी संघटित गुन्हे केले असल्याचे निष्पन झाले. अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांनी मोक्काच्या कारवाईचे आदेश दिले.