- पिंपरी चिंचवड शहरात वाढत्या कोरोना रुग्णसंख्येचा परिणाम…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०६ एप्रिल २०२१) :- पिंपरी चिंचवड शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने मेजर आणि मायक्रो कंटेनमेंट झोनची संख्या वाढली आहे. महिन्याभरात १८१ मेजर कंटेन्मेंट झोन तर १३५६ मायक्रो कंटेनमेंट झोन वाढले आहेत. सद्य: स्थितीत शहरात २५४ मेजर तर, १६४६ मायक्रो कंटेन्मेंट झोन आहेत.
महिन्याभरापूर्वी ४ मार्चला शहरात ७१ मेजर कंटेन्मेंट झोन होते. तर २९० मायक्रो कंटेनमेंट झोन होते. मार्चमध्ये रुग्णवाढीचा वेग वाढल्याने कंटेन्मेंट झोनच्या संख्येत वाढ झाली आहे. पूर्वीच्या तुलनेत कंटेन्मेंट झोनचे स्वरूप बदलण्यात आले आहे. रुग्ण आढळून आलेला पूर्ण परिसर बंद न करता त्या परिसरात रुग्णसंख्या किती आहे. त्यानुसार कंटेन्मेंट झोन ठरवला जातो.
बिल्डिंगच्या ज्या मजल्यावर दोन किंवा जास्त रुग्ण सापडले तर तो मजला बंद केला जातो, त्याला मायक्रो कंटेनमेंट झोन म्हणतात. बिल्डिंगमध्ये आठ रुग्णांच्यावर रुग्ण सापडले तर, ती बिल्डिंग बंद केली जाते. परंतु आजूबाजूचा परिसर सुरू असतो, त्याला मेजर कंटेन्मेंट झोन म्हणतात. शहरात सक्रिय रुग्णसंख्येच्या ७० टक्के रुग्ण हे गृहविलगीकरणात उपचार घेत आहेत. त्यामुळे देखील काही प्रमाणात कंटेन्मेंट झोन वाढले आहेत. रुग्ण संख्या वाढत असल्याने कंटेन्मेंट झोन आणि गृहविलगीकरणात असलेल्या रुग्णांवर वॉच ठेवण्याचे काम महापालिका प्रशासनाने केले आहे. गृहविलगीकरणात असलेले रुग्ण बाहेर फिरताना दिसून आल्यास फौजदारी गुन्हा आणि दंड करण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत.
रोज बदलते संख्या
कंटेन्मेंट झोनची संख्येत रोज बदल होतो. रुग्णसंख्या वाढली तर कंटेन्मेंट झोनची संख्या वाढते. रुग्ण कमी झाले की कंटेन्मेंट झोनची संख्या कमी होते. त्यामुळे रोज कंटेन्मेंट झोनचे आकडे कमी जास्त होत असतात.
















