कर्मचाऱ्यांना तत्काळ रुजू होण्याचे आयुक्तांचे आदेश…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०६ एप्रिल २०२१) :- वाढत्या कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेता, त्या नियंत्रणासाठी महापालिकेमार्फत उपाययोजना केल्या जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून वॉररूम सज्ज ठेवण्यात आली आहे. तेथे २५ कर्मचाऱ्यांची तातडीने नियुक्ती आयुक्त राजेश पाटील यांनी केली आहे.
रुग्ण व बेडसंख्येची अद्ययावत माहितीसाठी यंत्रणा तयार केली असून, तीन शिफ्टमध्ये वॉररूमचे कामकाज चालणार आहे. दिवसेंदिवस वाढत्या रुग्णसंख्येमुळे शहरात बेडची संख्या अपुरी पडू लागली आहे. गंभीर रुग्णांचे प्रमाण वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या स्थितीत तत्काळ सर्व प्रकारची माहिती उपलब्ध व्हावी. कुठे, किती, कोणत्या खाटा आहेत. खाटांचे नियोजन कसे करता येईल, याकरिता पालिकेची वॉररूम तयार करण्यात आली आहे.
ही वॉररूम अधिक सक्षम असणे गरजेचे असल्याचे मत पालिका आयुक्तांचे आहे. त्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेत वॉररूमसाठी विविध विभागांतील २५ कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. वॉररूमचे नियंत्रण आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रॉय व कार्यकारी अभियंता मनोज शेठीया यांचेकडे आहे. तीन शिफ्टमध्ये वॉररूमचे काम करावे. तसेच, सर्व कर्मचाऱ्यांना तत्काळ रुजू होण्याचे आदेश दिले असून, पालन न केल्यास शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा आयुक्त पाटील दिला आहे.
















