पालिकेच्या शिक्षणाधिकारी ज्योत्स्ना शिंदे अडचणीत..
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०८ एप्रिल २०२१) :- महापालिका शिक्षण विभागातील खरेदीबाबत दक्षता नियंत्रण विभागाचे उपायुक्त मंगेश चितळे यांनी शिक्षणाधिकारी ज्योत्स्ना शिंदे यांना प्रशासन विभागाने दिलेल्या नोटीसप्रकरणी खुलासा मागविला आहे. पिंपरी – चिंचवड महापालिका शिक्षण समिती साहित्य खरेदीवादात सापडली आहे.
शिक्षण विभागातील खरेदी प्रक्रियेबाबत महापालिका भांडार विभागाकडील नोटीस, प्रशासन विभागाकडील कारणे दाखवा नोटीस या अनुषंगाने दक्षता नियंत्रण विभागाने शिंदे यांच्याकडून खुलासा मागविला आहे. शिक्षण विभागातील शालेय साहित्य खरेदीप्रकरणी खालील अनियमितता दिसून येतात, असे म्हटले आहे.
शालेय साहित्य खरेदीकरण्यासाठी स्थायी समितीची मान्यता नसताना आपल्यामार्फत संबंधित शालेय साहित्य उत्पादकांना उत्पादन चालू कामासंदर्भात कळविण्यात आले. याबाबत आपणांस अधिकार प्रदान केलेले आहेत काय? स्थायी समितीच्या बैठकीस निदर्शनास आणून दिलेले का? स्थायीमध्ये विषयपत्र मागे घेण्यात आल्याने शालेय साहित्य उत्पादकांनी उच्च न्यायालय मुंबई येथे याचिका दाखल केली. निविदा प्रक्रियेला स्थगिती आणली. भांडार विभागाने प्रसिद्ध केलेल्या निविदेस व्यत्यय, अडथळा निर्माण झाला आहे.


















