- व्यापाऱ्यांना सरकारचा शब्द; मात्र, दुकानं उघडताच कारवाईचाही इशारा..
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०९ एप्रिल २०२१) :- आमच्यावर कारवाई झाली तरी, चालेल; पण आम्ही शुक्रवारपासून दुकाने उघडणारच या व्यापाऱ्यांनी दिलेल्या इशाऱ्यापुढे अखेर सरकार नमले आणि यातून मार्ग काढण्यासाठी दोन दिवसांचा वेळ मागितला. व्यापारी संघटनांनी त्यास मान्यता दिली असून, आता सोमवारपासून राज्यातील दुकाने सुरू करण्याचा निर्णय जाहीर केला आहे.
तत्पूर्वी, कोरोनाचे काय होणार माहीत नाही; मात्र आमचा व्यापार नक्कीच संपेल, अशी भावना व्यक्त करीत गुरुवारी (दि.८) शहरातील पुणे व्यापारी महासंघाने मानवी साखळी करत, काळ्या फिती लावून आंदोलन केले. शासनाच्या अन्यायी निर्णयाच्या विरोधात आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल आणि शुक्रवारी व्यापारी आपली दुकाने सुरू ठेवतील, असा ठाम निर्धारही व्यापाऱ्यांनी यावेळी व्यक्त केला. त्यानंतर निर्णयात बदल करण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी ऑनलाईन बैठक झाली.
व्यापाऱ्यांकडे वर्षानुवर्षे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची रोजीरोटीच धोक्यात आल्याने या आंदोलनात मालकांसमवेत कर्मचारीदेखील मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यात पुणे व्यापारी महासंघाशी संलग्र ८२ व्यापारी संघटना आहेत.
अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने बंद ठेवण्याबाबतचे आदेश शहरात लागू केले आहेत. त्यामुळे शासनाच्या आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधित व्यापा-यांवर, शासनाच्या आदेशानुसार आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत कारवाई होणारच, असा इशाराच महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिला होता.