- एक कोटीचा खर्च; स्थायीच्या मंजुरीची प्रतीक्षा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०९ एप्रिल २०२१) :- कोरोनाला अटकाव करण्यासाठी महापालिकेने व्यापक लसीकरण मोहीम सुरू केली आहे. लसीकरणासाठी सध्या ५० केंद्रे असून त्यासाठी ठेकेदारी पद्धतीने २०० कर्मचाऱ्यांची दोन महिन्यांसाठी नियुक्ती करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. त्यासाठी ब्रिक्स इंडिया, क्रिस्टल या ठेकेदारी कंपन्यांना सुमारे १ कोटीचा खर्च अदा केला जाणार आहे.
पालिका आयुक्तांनी तसा प्रस्ताव स्थायी समितीला पाठविला आहे. सध्या साथरोग नियंत्रण अनियम १८९७ आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५, महाराष्ट्र महापालिका अधिनियम कलम ६३ (६) व कलम ६७ (३) (क) यास अधीन राहून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोविड लसीकरण केंद्रासाठी कुशल व अकुशल कामगार नियुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. खासगी कंपन्यांना हे मनुष्यबळ पुरविण्याचे काम देण्यात आले आहे.
ब्रिक्स फॉसलिटीज प्रा. लि. कंपनीकडून ५० स्टाफ नर्स, २५ डेटा एंट्री ऑपरेटर, २५ वॉर्डबॉय, वॉर्ड आया असे एकूण १०० कुशल व अकुशल मनुष्यबळ घेण्यात येणार आहे. २ महिने कालावधीसाठी एकूण ५० लाख ८१ हजार २०० रुपये खर्च येणार आहे. तर, क्रिस्टल इंटिग्रेटेड सर्व्हिसेस प्रा.लि. यांच्याकडून ५० स्टाफ नर्स, २५ डेटाएन्ट्री ऑपरेटर, आया असे एकूण १०० कुशल व अकुशल मनुष्यबळ घेतले जाणार आहे. त्यासाठी दोन महिन्यांसाठी ५० लाख ८१ हजार २०० रुपये अदा केले जाणार आहे. एकूण १ कोटी १ लाख ६२ हजार ४०० रुपये खर्चास मान्यतेचा प्रस्ताव आयुक्त पाटील यांनी ‘ स्थायी’कडे पाठविला आहे.