आजपासून शहरातील दुकाने उघडण्यावर व्यापारी ठाम…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ एप्रिल २०२१) :- राज्य शासन व पुण्यातील स्थानिक प्रशासनाने जाहीर केलेल्या व लॉकडाऊनला पुणे व्यापारी महासंघाने तीव्र विरोध केला होता. त्यानंतर शुक्रवारीच व्यापाऱ्यांनी दुकाने उघडण्याचा निर्धार केला होता. पण एक दिवस मुख्यमंत्र्यांना निर्णयासाठी वेळ द्यावा म्हणून त्यांनी सोमवारपासून (दि. १२) दुकान उघडणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानुसार उद्यापासून शहरातील दुकाने उघडण्यावर व्यापारी ठाम असल्याची माहिती पुणे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष फतेचंद रांका यांनी दिली.
सर्व दुकाने सुरू करण्याची परवानगी द्यावी, यासाठी पुणे व्यापारी महासंघ, पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघटनाची विभागीय आयुक्त कार्यालयात रविवारी बैठक घेण्यात आली. यावेळी महापालिका आयुक्त विक्रम कुमार, पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, यासह सचिव व महासंघाचे सदस्य मोठ्या आहे संख्येने उपस्थित होते.
तब्बल दोन-अडीच तास चालेल्या बैठकीत प्रशासनाने गंभीर परिस्थितीची जाणीव व्यापाऱ्यांना करून दिली. परंतु गेल्या वर्षी तोट्यात गेलेला व्यापार आता सुरळीत होत असताना पुन्हा लॉकडाऊन लागले. व्यापाऱ्यांमुळे कोरोना वाढतो, अशी ओरड केली जाते; पण शहरात अनेक कारखाने, पेट्रोलपंप, रिक्षा, खाद्यपदार्थ, स्टॉलवर गर्दी आहे. नियमांचे पालन होत नाही. ज्यांच्यावर बंधने लादायला हवीत, यात त्यांना बंधने न घालता व्यापाऱ्यांवर बंधने घालणे हा अन्याय आहे.
रामनवमी, हनुमान जयंती, महावीर जयंती, गुढीपाडवा, अक्षयतृतीयेसारखे महत्त्वाचे सण आहेत. यामुळे व्यापारी लॉकडाऊनला कडाडून विरोध करत सोमवारी दुकाने सुरू ठेवण्यावर ठाम आहेत.
राज्यातील व्यापारी उद्या, सोमवारी सर्व दुकाने सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत दुकाने उघडणार असल्याचे महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स आणि इंडस्ट्रीजने जाहीर के ले आहे. यामुळे सरकार विरुद्ध व्यापारी असा संघर्ष होण्याची चिन्हे आहेत.