- प्लाझ्मा दात्यांना पालिकेकडून दोन हजारांची प्रोत्साहनात्मक मदत…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ एप्रिल २०२१) :- कोरोना रुग्णांसाठी प्लाझ्मा थेरपी नवसंजीवनी ठरत आहे. मात्र, प्लाझ्मा देण्यासाठी दाते पुढे येत नाहीत, ही स्थिती आहे. प्लाझ्मा दात्यांना महापालिकेकडून दोन हजार रुपयांची प्रोत्साहनात्मक मदत दिली जाणार आहे. दात्यांची संख्या वाढविण्यासाठी महापालिकेकडून दात्यांना आवाहन करण्यात आले आहे.
सध्या खासगी रुग्णालयांमधील रुग्णांना सहा हजार रुपये दराने प्लाझ्मा घ्यावा लागत आहे. त्याऐवजी आता महापालिकेच्या रक्तपेढीतून या रुग्णांना मोफत प्लाझ्मा पुरविण्यात येणार आहे. याचा शहरातील गरजू नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन महापौर माई ढोरे यांनी केले आहे. संसर्गाच्या भीतीने रक्तदानाचे प्रमाण कमी झाले असून प्लाझ्मा संकलन प्रक्रियेवर परिणाम झाला आहे.
कोरोनामुक्त व्यक्ती प्लाझ्मादान करू शकतात. मात्र, पुन्हा संसर्ग होईल या भीतीने प्लाझ्मा दात्यांची संख्या कमी झाली आहे. प्लाझ्मा किंवा प्लाझ्मा थेरपीसाठी दाता हवा आहे, असे असंख्य फोन आणि मेसेज येत आहे. दरवर्षी उन्हाळ्यात रक्तदान मोहीम थंडावते. शिवाय कोरोना संसर्गामुळे रक्तदानाचे प्रमाण कमी झाले आहे. त्याचा फटका प्लाझ्मादानाला बसला आहे. शहरातील विविध सामाजिक संस्थांच्या वतीने आवाहन करूनही प्लाझ्मा देण्यासाठी फारसे लोक पुढे येत नसल्याने मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवत आहे. हा तुटवडा भरून काढण्यासाठी कोरोनामुक्त व्यक्ती व शहरातील विविध सामाजिक संघटनांनी कोरोनावर मात करण्यासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे, असे सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी सांगितले.


















