- ‘कोरोनाबाधित रुग्णांना मानसिक आधाराची गरज’…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ एप्रिल २०२१) :- कोरोना बाधित रुग्णांला मानसिक आजाराची आवश्यकता असते. कुटुंबियांना बोलल्यानंतर त्यांना धीर मिळतो. परंतु, नेहरुनगर येथील जम्बो कोविड केअर सेंटरमध्ये रुग्णांना आतमध्ये मोबाईल फोन नेवू दिला जात नाही. हे अत्यंत चुकीचे आहे. मोबाईल नसल्याने रुग्णाचा कुटुबियांशी कसलाही संपर्क होत नाही. त्यामुळे रुग्ण खचून जातो. त्यासाठी जम्बो सेंटरमध्ये रुग्णांना मोबाईल सोबत घेवून जाण्याची परवानगी द्यावी, अशी सूचना उपमहापौर हिराबाई उर्फ नानी घुले यांनी प्रशासनाला केली आहे.
याबाबत उपमहापौर घुले यांनी महापालिका आयुक्त राजेश पाटील यांची भेट घेतली. मोबाईल फोन नसल्याने रुग्णांना येणा-या अडचणींची प्रशासनाला जाणीव करुन दिली. मोबाईल फोन घेवून जाण्याबाबतचे सविस्तर निवेदन आयुक्तांना दिले. त्यात उपमहापौर घुले यांनी म्हटले की, कोरोनाची लागण झाल्याने रुग्ण खचून जातात. भीतीने घाबरतात. संपूर्ण कुटुंब चिंतेत, तणावात असते. त्यामुळे रुग्ण आणि कुटुबियांचा संपर्क होणे गरजेचे आहे. बाधिताला मानसिक आदाराची आवश्यकता असते. कुटुंबियांशी, नातेवाईकांशी संवाद साधल्यावर जगण्याची उमेद मिळते. रुग्ण तणावमुक्त होतो.
मात्र, महापालिका चालवत असलेल्या नेहरुनगर येथील जम्बो कोविड केअर सेंटरमध्ये कोरोनाबाधित रुग्णाला आतमध्ये मोबाईल फोन नेवू दिला जात नाही. हे अत्यंत चुकीचे आहे. इतर रुग्णालयात कोरोनाबाधित रुग्णांना मोबाईल फोन सोबत बाळगू दिला जातो. पण, जम्बोतच मोबाईल नेण्यास परवानगी का, नाही. जम्बो सेंटरचा संपूर्ण खर्च महापालिका करते. त्यामुळे कोणाची मनमानी खपवून घेवू नये.
मोबाईल फोन नसल्याने रुग्णाचा नातेवाईकांशी कसलाही संपर्क होत नाही. नातेवाईकांनाही रुग्णाच्या प्रकृतीची माहिती मिळत नाही. कोरोना आजारापेक्षा माणसिक खच्चीकरणाने लोकांचा मृत्यू होत आहे. कोरोना बाधित रुग्णांना मानसिक आधाराची मोठी आवश्यकता असते. कुटुंबिय, नातेवाईकांशी, मित्रांशी बोलल्यानंतर रुग्णाला धीर मिळतो. जगण्याची प्रेरणा मिळते. कुटुंबाला रुग्णांच्या प्रकृतीची माहिती मिळते. त्यामुळे कुटुंब देखील रिल्कस राहते. त्यासाठी नेहरुनगर येथील जम्बो सेंटरमध्ये कोरोना बाधित रुग्णांना मोबाईल फोन आतमध्ये नेण्याची परवानगी द्यावी, अशी सूचना उपमहापौर घुले यांनी आयुक्तांना केली आहे.


















