- मुंडे साहेबांची स्वप्न पुर्ण करण्यासाठी अथक प्रयत्न करीन…..पंकजा मुंडे
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ डिसें.) :- लोकनेते मुंडे साहेबांचे नेतृत्व अष्टपैलू होते. जीवनात अनेक संघर्ष करून ते मोठे झाले. सर्वसामान्य जनतेचे अनेक प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी अथक प्रयत्न केले. गरीब, कष्टकरी, कामगार, शेतकरी, शेतमजूर, ग्रामीण भागातील नागरिकांचे जीवनमान उंचवावे यासाठी मुंडे साहेबांनी अनेक स्वप्ने पाहिली होती. ती पूर्ण करण्यासाठी मी जीवनभर अथक प्रयत्न करीन, असे ग्रामविकास, महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितले.
लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे यांच्या ६९ व्या जयंतीनिमित्त रविवारी (दि. २३) रोजी पंकजा मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली ‘आठवणीतील मुंडेसाहेब’ या कार्यक्रमाचे आयोजन चिंचवड येथे केले होते. यावेळी शिवव्याख्याते अशोक बांगर यांचे व्याख्यान झाले.
व्यासपिठावर पालकमंत्री गिरीश बापट, दुग्धविकास राज्यमंत्री महादेव जानकर, भाजपा शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप, आमदार माधुरी मिसाळ, राजस्थानातील भाजपचे आमदार जस्सीराम कोळी, महापौर राहुल जाधव, प्राधिकरणाचे अध्यक्ष व कार्यक्रमाचे निमंत्रक सदाशिव खाडे, राज्य लेखा समितीचे अध्यक्ष ॲड. सचिन पटवर्धन, ज्येष्ठ नेत्या उमा खापरे, प्रतिभा लोखंडे, राजेश पिल्ले, पक्षनेते एकनाथ पवार, भाजपा शहर महिला अध्यक्षा शैला मोळक, भाजपा प्रवक्ते अमोल थोरात, नगरसेवक चंद्रकांत नखाते, माऊली थोरात, शितल शिंदे, संदीप वाघेरे, मोरेश्वर शेडगे, नगरसेविका अनुराधा गोरखे, पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन, पीएमआरडीएचे अध्यक्ष किरण गित्ते, अरुण पवार, कुसुम नागरगोजे, उद्योजक आबासाहेब नागरगोजे, स्वरदा बापट आदी उपस्थित होते.
यावेळी महापौर राहुल जाधव, बाल हक्क आयोगाचे अध्यक्ष प्रविण घुगे, नगरसेवक केशव घोळवे, नगरसेविका योगिता नागरगोजे, माजी आमदार गोविंद केंद्रे, म्हाडाचे सभापती बाळासाहेब पाटील, जस्सीराम कोळी, दीपक ढाकले, शिक्षक खंडू खेडकर, अरुण पवार, कुस्तीपटू प्रगती गायकवाड यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
पंकजा मुंडे म्हणाल्या की, प्रत्येक कार्यकर्त्याला मुंडे साहेब आपलेच आहेत असे वाटायाचे, त्यांचे कार्यकर्त्यांशी आपुलकीचे संबंध होते. एखाद्या निवडणुकीत उमेदवारी मिळाली नाही तर कार्यकर्ते साहेबांशी भांडायचेसुध्दा पण तुला न्याय देऊ शकलो नाही याचे दुःख आहे. पुढे चांगली संधी मिळेल असे म्हणत ते त्यांची समजूत काढत. एखादी जबाबदारी देऊन त्याला बरोबर घेत असत. साहेबांना जे पाहिजे होते ते सर्वसामान्यांसाठी पाहिजे होते. त्यामुळे साहेब लढा देताना थकले नाहीत. राजकारणात कार्यरत असताना अनेक पदे मिळतात. परंतु, त्या पदांचा उपयोग स्वतःसाठी न करता नागरिकांच्या भल्यासाठी करावा हा साहेबांचा सल्ला मी जीवनभर आचरणात आणीन. बाबांनी सांगितल्याप्रमाणे, ‘उतणार नाही, मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही’. तसेच बाबांचे मार्गदर्शन व कार्यकर्त्यांच्या प्रोत्साहनामुळे ग्रामीण भागात जनसामान्यांसाठी अधिक जोमाने चांगले काम उभे करीन, असा विश्वास पंकजा मुंडे यांनी व्यक्त केला.
गिरीश बापट म्हणाले की, भाजपाची ओळख महाराष्ट्रातील गावागावत होण्यासाठी अनेकांनी अपार कष्ट केले. पक्षाला जेव्हा माणसांची गरज होती तेव्हा गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन, नगरचे राजाभाऊ झरकर, उत्तमराव पाटील असे अनेक जणांनी परिश्रम घेतले. या व्यक्तींच्या संघर्षामुळेच भाजपचा वटवृक्ष मोठा झाला आहे. ज्या व्यक्तीला माणसे जोडण्याची कला अवगत असते तो राजकारणामध्ये यशस्वी होतो. गोपीनाथ मुंडे यांना ही कला अवगत होती. त्यांचे विरोधकांशीही मैत्रीपूर्ण संबंध होते. याचा अनुभव १९९५ च्या युती सरकारच्या काळात जवळून पाहिला. एखाद्या विषयावर आमदारांनी बोलू नये असे वाटत असेल तर गोपीनाथरावांनी डोळ्यांनी नुसती खूण केली की, आमदार सभागृहातून बाहेर निघून जात. शरद पवार समोर असतानाही सभागृह दणाणून सोडण्याचे काम गोपीनाथ मुंडे यांनी केले. गोपीनाथ मुंडे यांचे कार्य पुढे प्रामाणिकपणे सुरू ठेवणे हे आपणा सर्वांचे कर्तव्य आहे असे बापट म्हणाले.
महादेव जानकर म्हणाले, ३१ मे २०१६ मध्ये साहेबांनी वारसदार म्हणून माझी निवड केली. मला पैसा नको तर मुंडे साहेबांच्या कार्याचा वारसा पाहिजे म्हणून मी कार्य करत आहे. सामान्य कार्यकर्त्याला धीर देण्याचे, आवश्यक ती संधी देण्याचे काम साहेबांनी केले. साहेबांचे विचार वाढवण्यासाठी तरुणांनी पुढे आले पाहिजे. तसेच सदाशिव खाडे यांचे मुळगाव येनकुळ, तालुका खटाव, जिल्हा सातारा येथे गोपीनाथ मुंडे यांचे स्मारक उभारण्यात येणार आहे. यासाठी आमदार निधीतून १० लाखांची मदत करणार असल्याची घोषणा जानकर यांनी केली.
यावेळी राहुल जाधव, ॲड. सचिन पटवर्धन, आमदार लक्ष्मण जगताप, सदाशिव खाडे, आर. के. पद्मनाभन, किरण गित्ते, बाळासाहेब पाटील, गोविंद केंद्रे यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणी सांगितल्या. या कार्यक्रमाच्या आयोजनात लोकनेते गोपीनाथ मुंडे जयंती कृती समिती पिंपरी चिंचवड, मराठावाडा जनविकास मंच, लोकनेते गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान, गोपीनाथ मुंडे फाऊंडेशन, भगवानबाबा मित्रमंडळ, ब्रम्हचैतन्य फाऊंडेशन, जय भगवान युवा फाऊंडेशन, भगवान सेना, भगवानबाबा युवा मंच, जय भगवान महासंघ, राष्ट्रसंत भगवानबाबा प्रतिष्ठान आदी संस्थांनी सहभाग घेतला आहे.
सुत्रसंचालन भाऊसाहेब कोकाटे, प्रास्ताविक कार्यक्रमाचे निमंत्रक सदाशिव खाडे तर आभार रघुनंद घुले यांनी मानले.















