- दुकानात घुसून व्यापाऱ्यावर हल्ला; तीन विधिसंघर्षित बालकांविरुद्ध गुन्हा, एक ताब्यात तर दोघांचा शोध…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. २७ जुलै २०२६) :- पिंपरीतील रिव्हर रोडवरील कपडा मार्केटमध्ये भरदिवसा कोयत्याचा धाक दाखवत हप्ता मागून ३० हजार रुपयांची लूट केल्याची धक्कादायक घटना शनिवारी (२६ जुलै) दुपारी घडली. या प्रकरणी पिंपरी पोलिसांनी तीन विधिसंघर्षित बालकांविरुद्ध गंभीर कलमांन्वये गुन्हा दाखल केला असून, एकाला ताब्यात घेतले आहे तर दोघे फरार आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हर्ष प्रदीप पागराणी (वय २१) हे त्यांच्या वडिलांसह व तीन कामगारांसोबत रिव्हर रोडवरील ‘चॉईस व्हरायटी’ दुकानात काम करत असताना तीन आरोपी कोयते घेऊन दुकानात घुसले. त्यांनी हप्ता म्हणून पैशांची मागणी करत कोयत्याचा धाक दाखवून दुकानातील ३० हजार रुपये रोख, पूजेसाठी ठेवलेली पितळी नाणी आणि गुरु लीलाशाबाबा यांचा फोटो बळजबरीने घेऊन पळ काढला.
फिर्यादी यांनी आरोपींना अडविण्याचा प्रयत्न केला असता, एका आरोपीने फायटरसदृश हत्याराने त्यांच्या डाव्या हातावर वार करून जखमी केले. मदतीसाठी धावलेल्या इतर दुकानदारांनाही आरोपींनी कोयत्याचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी दिल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आणि अनेक दुकानदारांनी दुकाने बंद केली.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक केणे आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक लोहार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.


















