- लॉकडाउन उठल्यानंतरच पुढील प्रक्रियेला मिळणार गती…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ एप्रिल २०२१) :- पंतप्रधान आवास योजनेच्या अर्ज छाननीचे काम बंद ठेवण्यात आले आहे. केंद्र व राज्य शासनाच्या सूचनेनुसार लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने हा निर्णय घेतला आहे. झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन विभागाबाहेर नागरिकांच्या माहितीसाठी फलक लावण्यात आला आहे.
कोरोनाचे वाढते रुग्ण कमी करण्यासाठी ब्रेक द चेन अंतर्गत शासनाने राज्यात लॉकडाउन लागू केला आहे. तसेच शासकीय कार्यालयात नागरिकांना बंदी करण्यात आली. अधिकाऱ्यांची ५० टक्के उपस्थिती करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून पिंपरी चिंचवड महापालिकेच्या झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन विभागांतर्गत पंतप्रधान आवास योजनेच्या पात्र लाभार्थ्यांच्या अर्जाची छाननी सुरू आहे. कागदपत्रे योग्य आहेत की नाही नसल्यास त्यामधील त्रुटी सांगणे, योग्य कागदपत्रे घेणे आदी कामे सुरू आहेत.
या योजनेचे ३ हजार ६६४ लाभार्थी असून त्यांना टप्प्याटप्प्याने बोलावले जात आहे. मात्र आता छाननीचे कामे बंद करण्यात आले आहे. झोनिपु कार्यालयाबाहेर तसा फलकही लावण्यात आला आहे. केंद्र व राज्य शासनाच्या निर्देशानुसार हे काम बंद करण्यात आले असल्याची माहिती फलकावर देण्यात आली आहे. लॉकडाउन संपल्यानंतर व शासनाचे आदेश आल्यानंतर पुढील प्रक्रिया केली जाईल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
















