- राज्य सरकारांना ४००, तर खासगी रुग्णालयांना ६०० रुपयांचा दर…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ एप्रिल २०२१) :- राज्यांसह खुल्या बाजारात लसविक्रीस केंद्राने मुभा दिल्यानंतर देशातील सर्वांत मोठी लस उत्पादक कंपनी असलेल्या सीरम इन्स्टिट्यूटने बुधवारी ‘कोव्हिशिल्ड’ लशीची किंमत जाहीर केली.
त्यानुसार राज्य सरकारांना ४००, तर खासगी रुग्णालयांना ६०० रुपयांना लसमात्रा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. मात्र, प्रत्यक्षात लस लाभार्थ्यांना किती पैसे मोजावे लागतील, हे अद्याप अस्पष्ट आहे.
लसीकरण मोहिमेची व्याप्ती वाढवताना केंद्र सरकारने १८ वर्षांवरील सर्वांना १ मेपासून लस देण्यात येईल, असे जाहीर केले आहे. त्याच वेळी सरकारने खुल्या बाजारासह राज्यांना लसविक्री करण्यास निर्मात्यांना मुभा दिली. या पार्श्वभूमीवर सीरम इन्स्टिट्यूटने बुधवारी प्रसिद्धीपत्रकाद्वारे ‘कोव्हिशिल्ड’ लशीची किंमत जाहीर केली.