- कोविड सुपर स्प्रेडरने सतरा दिवस घरातच थांबावे; मार्गदर्शक सूचनांचा अवलंब करावा..
- सामाजिक कार्यकर्ते संतोष बारणेंची बाधितांना आर्त साद…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ एप्रिल २०२१) :- होम क्वारंटाईन केलेले रुग्ण विनाकारण घराबाहेर पडून सुपर स्प्रेडरची भमिका बजावत असून त्यामुळे रुग्ण संख्येत मोठ्या प्रमाणांत वाढ होत आहे. मृतांच्या संख्येतही वाढ झाली आहे. यामुळे होम क्वारंटाईन केलेल्या रुग्णांनी सुजाण नागरिकाची भुमीका पार पाडावी, असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते संतोष बारणे यांनी पत्रकाद्वारे केले आहे.
पत्रकात त्यांनी म्हटले आहे कि, घरी होम क्वारंटाईन केलेली लोकं पाच ते सात दिवसात बाहेर पडुन सुपर स्प्रेडर ठरत आहेत. होम क्वारंटाईन केलेले कोविड पेशंट १४ ते १७ दिवस सामान्य लोकांच्या संपर्कात येता कामा नये. कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण हा १२ ते १४ दिवस सामान्य निरोगी व्यक्तीस संसर्ग पसरवू शकतो. मला काही लक्षण नाहीत, मी आता बरा आहे. मला काहीच त्रास नाही होत, मला दमपण लागत नाही, माझं सॅच्युरेशनही नॉर्मल आहे, अशी कारणं सांगत रुग्ण ५ ते ७ दिवसात घराच्या बाहेर पडुन सुपरस्प्रेडरची भुमिका निभावत आहेत.
प्रशासनाला, सरकारला दोष देत बसण्यापेक्षा आपण प्रशासनाला काय मदत करू शकतो? हा विचार करा. सरकार, प्रशासन त्याच्या लेवलवर पुर्णपणे काम करतंय. आपण सुजाण नागरिक म्हणून प्रशासनाच्या पुर्णपणे पाठीशी उभं राहिलं पाहिजे. होम क्वारंटाईन रुग्णाने चौदा दिवस घरात आयसोलेशनमध्ये राहुन प्रशासनाला मदत केली पाहिजे. सुपर स्प्रेडर म्हणून बाहेर पडू नये. सुपर स्प्रेडर स्वत:च्या परिवारासाठी व समाजासाठीही घातक आहेत. होम क्वारंटाईन कोविड पॉझिटिव्ह रुग्णांनी सामाजिक जबाबदारीचे भान ठेवत प्रशासनाला योग्य ते सहकार्य करावे, असे या पत्रकात बारणे यांनी म्हटले आहे.